लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ‘सीएए’, ‘एनआरसी’ विरोधात पुकारलेल्या देशव्यापी बंदच्या कारणावरून बुधवारी बडनेरा शहरात दुकाने बंद करताना तणावाची स्थिती निर्माण झाली होती. काही काळ दोन्ही गट आमने-सामने आले. मात्र, पोलिसांनी वेळीच दखल घेतल्याने तणाव निवळला. दरम्यान जमावाने जुनीवस्तील ऑटो बंद करतावेळी एसटी बस रोखल्याने प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.‘सीएए’, ‘एनआरसी’ कायद्याला विरोध करणारा गट बुधवारी सकाळी ९ पासून एकवटला होता. बडनेऱ्याच्या जुनिवस्ती जलकुंभासमोरील अमरावती मार्गावर ये-जा करणाऱ्या ऑटोरिक्षाचालकांनी बंदसाठी पुढाकार घेतला होता. जमावातील काहींनी ऑटो रिक्षातून प्रवासी उतरविण्यापर्यंत मजल गाठल्याचे दिसून आले. मात्र, जमावात मोठी गर्दी झाल्यामुळे ऑटोरिक्षासह शहर बस, एसटी बसदेखील रोखून बंदचे समर्थन केले. प्रवाशांना नाहक त्रास होत असल्याने पोलिसांनी जमावाला रस्त्याच्या बाजूला केले. रोखून ठेवलेल्या एसटी बस, ऑटो पुन्हा सुरू केले. यावेळी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जमावाला संवैधानिक मार्गाने आंदोलन करण्याचा सल्ला दिला. ही लढाई केंद्र सरकारविरूद्ध असून, सामान्य माणसाला त्रास देऊ नका, अशी भूमिका घेतली. त्यानंतर जमावाने रस्त्यावरील गर्दी कमी केली. नवीवस्ती भागात जमावाने दुकाने बंद करताना बळजबरी केल्याच्या कारणावरून दोन्ही गट आमने-सामने आले होते. सकाळी १० वाजताच्या सुमारास दबाव टाकून दुकाने बंद करण्यात आली. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली. मात्र, या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी नवीवस्तीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर भाजप, सेनेसह व्यापारी एकवटले होते. बंद ठेवायचे की नाही? ही बाब ऐश्चिक असून, बळजबरी कशासाठी यावरून येथे दोन्ही गट आमने-सामने आलेत. काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. ‘भारत माता की जय’, जय भवानी-जय शिवाजी’च्या नाऱ्यांनी परिसर दणाणून सोडला होता. घटनास्थळी हजर असलेले सहायक पोलीस आयुक्त शोहेल शेख, ठाणेदार शरद कुळकर्णी यांनी दोन्ही गटाची समजूत काढली. कालांतराने तणाव निवळला, हे विशेष.दुपारी १२ वाजेपर्यंत दुकाने बंद‘सीएए’, ‘एनआरसी’ विरोधात बडनेऱ्यात पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. जमावाने दुकाने बंद केल्यानंतर बुधवारी दुपारी १२ वाजेपर्यंत बंद कायम होता. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली असताना ते पुन्हा सुरू करा, अशा सूचना एका गटाने केल्यानंतरही व्यावसायिकांनी मात्र दुकाने दुपारी १२ वाजेनंतरच सुरू केल्याचे दिसून आले. बडनेऱ्यात निर्माण झालेल्या परिस्थितीवर पोलीस बारकाईने लक्ष ठेवून होते.
बडनेऱ्यात दुकाने बंदच्या कारणावरून तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 6:00 AM
‘सीएए’, ‘एनआरसी’ कायद्याला विरोध करणारा गट बुधवारी सकाळी ९ पासून एकवटला होता. बडनेऱ्याच्या जुनिवस्ती जलकुंभासमोरील अमरावती मार्गावर ये-जा करणाऱ्या ऑटोरिक्षाचालकांनी बंदसाठी पुढाकार घेतला होता. जमावातील काहींनी ऑटो रिक्षातून प्रवासी उतरविण्यापर्यंत मजल गाठल्याचे दिसून आले. मात्र, जमावात मोठी गर्दी झाल्यामुळे ऑटोरिक्षासह शहर बस, एसटी बसदेखील रोखून बंदचे समर्थन केले.
ठळक मुद्देदोन्ही गट आमने-सामने : आॅटो केले बंद, एसटी बस रोखल्या, प्रवाशांना नाहक त्रास