अमरावती : पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा न घेता त्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केला. त्यानंतर नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांची ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील लाखो विद्यार्थ्यांचे परीक्षेचे टेन्शन गेले आहे. परीक्षा रद्द झाल्याने ऑनलाईन अभ्यासक्रमासही विद्यार्थ्यांनी पूर्णविराम दिला आहे.
दहावीसाठी नववी, तर बारावीसाठी अकरावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा पाया भक्कम असणे आवश्यक मानण्यात येतो. कोरोना परिस्थितीमुळे ना नियमित शाळा, ऑनलाईन क्लासलाही दांडी. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. दिवाळीदरम्यान नववी व अकरावीचे वर्ग नेहमी सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, डिसेंबरनंतर कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होत असल्याचे दिसून आल्याने राज्य शासनाने नियमित वर्ग भरण्यावर निर्बंध घातले. कोरोना परिस्थितीमुळे सलग दोन वर्षांपासून पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची वार्षिक लेखी परीक्षा रद्द करण्यात आली. त्यापाठोपाठ आता नववी व अकरावीमधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. शहर व ग्रामीण भागात एकूण दीड हजारांवर शाळा व लाखो विद्यार्थी आहेत. त्यामुळे इयत्ता पहिली ते आठवी व नववी आणि अकरावीमधील विद्यार्थ्यांचे आता परीक्षेचे टेन्शन मिटले आहे. परिणामी विद्यार्थी बिनधास्त झाल्याचे दिसून येत आहे.