अमरावती : कोरोना महामारीचे संकट गहिरे होत आहे. शहरात दरदिवशी कोविड, सारी व इतर आजाराने ८ ते १३ व्यक्ती दगावण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी येथील हिंदू स्मशानभूमी प्रशासनावर अंत्यविधीसाठी ताण येत असून, पर्याय म्हणून खुल्या जागेवर मृतदेहाचे अंत्यविधी सोपस्कार आटोपले जात आहेत.
एप्रिल महिन्यात कोरोना संक्रमित आणि मृतांची आकडेवारीत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना संसर्ग, सारी, दमा अशा गंभीर आजाराने मृत्यू झालेल्या व्यक्तींचे अंत्यविधी गॅस दाहिनी प्रकल्पात करण्यात येत आहे. गॅस दाहिनीत एका मृतदेहाच्या अंत्यविधीसाठी किमान दोन तास लागतात. आपसुकच मृतदेहांची संख्या वाढत असल्याने गॅस दाहिनीत अंत्यविधीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. बरेचदा नातेवाईक अथवा आप्तेष्टांना प्रतीक्षा करणे सोयीचे ठरत नाही. त्यामुळे कोरोनाने मृत्यू झालेल्यांचे अंत्यविधी सरणावर खुल्या जागेवर करण्यात येत असल्याची माहिती हिंदू स्मशान भूमीचे प्रबंधक एकनाथ ईंगळे यांनी दिली. अंत्यविधीसाठी गॅस दाहिनी, सरणावर अशा दोन्ही प्रकारची व्यवस्था आहे. केवळ मृतदेहांची संख्या वाढल्याने अंत्यविधीसाठी वेळ लागत असल्याचे चित्र आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी गुरुवारी स्मशानभूमीची पाहणी केली असता हेच चित्र त्यांना निदर्शनास आले. शुक्रवारी हिंदू स्मशानभूमीत सायंकाळी ७ वाजता कोरोना, सारी व इतर आजाराने दगावलेले ११ रुग्ण तर ७ नैसर्गिक मृत्यू झालेल्यांचे अंत्यविधी करण्यात आल्याची माहिती आहे.
बॉक्स
१५ दिवसांत कोरोनाचे बळी
---
गॅस दाहिनीचे दाेन्ही प्रकल्प सकाळी ७ ते रात्री ११ वाजतादरम्यान निरंतरपणे सुरू आहे. अंत्यविधीसाठी क्षमतेपेक्षा जास्त मृतदेह येत आहे. त्यामुळे गॅस दाहिनी आणि सरणासाठी वेटींग आहे. त्यामुळे खुल्या जागेवर अंत्यविधी करण्यात येत आहे.
- आर.बी. अटल, अध्यक्ष, हिंदू स्मशानभूमी संस्था.