अमरावती : कोरोनामुळे ना शाळा, ना परीक्षा थेट निकालाने दहावीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. मात्र, अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा नाही, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे राज्य शिक्षण मंडळाने सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय आता गुंडाळला जाणार आहे. परिणामी जिल्ह्यात दहावीचे ३८ हजार ९६४ विद्यार्थी उत्तीर्ण असून, गुणांच्या आधारे अकरावी, आयटीआय, तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.
जिल्ह्यात कला, वाणिज्य, विज्ञान व एमसीव्हीसी असा एकूण प्रवेशाच्या १५३६० जागा आहेत. त्यापैकी गतवर्षी १०९३५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. यंदा दहावीचा निकाल ९९.९७ टक्के जाहीर झाला आहे. दहावीच्या गुणांच्या आधारे अकरावीत प्रवेश होणार असल्याने नामांकित, प्रमुख महाविद्यालयात विद्यार्थ्यांची धाव असेल, असे दिसून येते. १६ जुलै रोजी ऑनलाईन निकाल जाहीर झाला, हे विशेष. आता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अकरावी प्रवेशासाठी सहा आठवड्यात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
----------------
अशी आहे अमरावती शहरात प्रवेश क्षमता
कला : ३३७०
वाणिज्य : २४०३
विज्ञान : ६५४०
एमसीव्हीसी : ३०२०
-----------------
जिल्ह्यात आयटीआयची वस्तुस्थिती
एकूण शासकीय आयटीआय : १८
खासगी आयटीआय : १३
शासकीय आयटीआय प्रवेश क्षमता : ४९८०
खासगी आयटीआय प्रवेश क्षमता : १५१६
एकूण प्रवेशाच्या जागा : ६४९६
--------------
दहावीच्या निकालावर एक नजर
एकूण उत्तीर्ण विद्यार्थी : ३८९६४
प्रावीण्य श्रेणी : १६९७६
प्रथम श्रेणी : १८७०३
द्वितीय श्रेणी : ३२४४
उत्तीर्ण : ४१
नापास विद्यार्थी : ०८
---------------------
अशी आहे तंत्रनिकेतनची प्रवेश क्षमता
जिल्ह्यात एकूण तंत्रनिकेतन : ०६
शासकीय : ०२, प्रवेश - ६९०
अनुदानित : ०१, खासगी : ०४, प्रवेश ११५८
एकूण प्रवेश क्षमता : १८४८
--------------
उच्च न्यायालयाने सीईटीविना अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने पुढे प्रवेश करण्यात येतील. प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेश देण्याबाबत नियोजन केले जाईल. १६ ऑगस्टपासून अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे.
- अरविंद मंगळे, समन्वयक, केंद्रीय ऑनलाईन प्रवेश समिती.