अमरावती : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून एप्रिलमध्ये होणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षांवर शिक्षकांचे विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बहिष्कार आंदोलन कायम आहे. मुंबई येथील आझाद मैदानावर शिक्षकांनी पुकारलेल्या उपाेषणावर काही अंशी तोडगा काढण्यासाठी निधी वितरित केला आहे. मात्र, परीक्षांवर बहिष्कार कायम आहे.
विनाअनुदानित, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिकच्या शिक्षकांनी वेतन अनुदानाच्या मुद्द्यावर दहावी, बारावीच्या परीक्षांच्या कामकाजावर शिक्षकांनी बहिष्कार टाकला आहे. यात राज्य शिक्षक संघ हिरिरीने सहभागी झाला आहे. शिक्षकांच्या मागणीनुसार १३ सप्टेंबर २०१९ रोजी २० टक्के अनुदानास पात्र शाळा तसेच २० टक्के अनुदान घेत असलेल्या शाळांना ४० टक्के अनुदानाचा टप्पा वितरित करण्याची मागणी आहे. विविध क्षुल्लक कारणांनी शाळांचे अनुदान रोखण्याची मालिका थांबवावी, ही देखील प्रमुख मागणी आहे. शाळांची त्रुटी पूर्तता होताच अनुदान वितरित व्हावे, अशी मागणी आहे. एकीकडे दहावी, बारावीच्या परीक्षांचे टेन्शन आणि शिक्षकांचे बहिष्कार यातून शिक्षण विभाग कसा मार्ग काढते, याकडे अन्यायग्रस्त शिक्षकांचे लक्ष लागले आहे.
--------------
राज्य शासनाने तोडगा काढण्यासाठी शिक्षक उपोषणकर्त्यांना निधी वितरित केला. मात्र, अघोषित शाळांना निधी वितरित करणे, अनुदान देण्याची मागणी कायम आहे. त्यामुळे दहावी, बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार कायम आहे.
-दिलीप कडू, अध्यक्ष, शिक्षक संघ अमरावती
-------------------
प्रवेश असलेल्या शाळांवरच परीक्षा
दहावी, बारावीच्या परीक्षा विद्यार्थी प्रवेशित असलेल्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात होणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे काेरोना काळात एका केंद्रातून दुसऱ्या केंद्रावर ये-जा करण्याची भानगड संपली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यंदा अमरावती विभागात अकोला, यवतमाळ, अमरावती, बुलडाणा व वाशिम या पाचही जिल्ह्यांत दहावीचे १,६४,६३२ तर, बारावीचे १,३७,५६९ परीक्षार्थी असणार आहेत.