अमरावती : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदतवाढ १२ एप्रिल रोजी संपुष्टात आली. त्यामुळे आता पुन्हा मुदतवाढ की, प्रशासक बसणार याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. दरम्यान शासनस्तरावर मुदतवाढीसाठी प्रस्ताव पाठविल्याची माहिती सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली. मात्र, यावर अद्याप कुठलेही आदेश प्राप्त झाले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत १२ ऑक्टोबर २०२० रोजी संपुष्टात आली. नवीन संचालक मंडळासाठी निवडणुका अपेक्षित असताना कोरोना संक्रमणामुळे शासनाने सहा महिन्यांनंतर निवडणुका पुढे ढकलण्याचे आदेश काढले होते. त्या आदेशानुसार विद्यमान संचालक मंडळात सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. विशेष म्हणजे या बाजार समितीत पाच वर्षांत तीन सभापती झालेत. १२ ऑक्टोबर २०२० ला मुदत संपल्यानंतर कोरोना संक्रमणामुळे मंडळ कायम राहिले. वाढीव तरतुदीनुसार गत १२ एप्रिल २०२१ ला वाढीव मुदतही संपुष्टात आल्याने संचालक मंडळाच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह लागले आहे. दरम्यान अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची वाढीव मुदत संपल्यामुळे आता पुन्हा मुदतवाढ मिळणार की, प्रशासक नेमला जाणार याबाबत तर्कविर्तक लावले जात आहेत.
कोट
बाजार समितीचे संचालक मंडळाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली किंवा नाही. यासंदर्भात अद्याप कोणतेही आदेश प्राप्त झाले नाही. तसा प्रस्ताव शासनाकडे पणन संचालक पातळीवरून गेला आहे.
- संदीप जाधव,
जिल्हा उपनिबंधक