अमरावती : अतिरिक्त बांधकाम असल्यास ते नियमित करुन घेण्यासाठी संबंधितांनी ३१ जुलैपर्यंत महापालिकेत अर्ज सादर करावेत, असे आवाहन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी केले आहेत. अन्यथा १ आॅगस्टनंतर ते बांधकाम जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.राज्य शासनाच्या नवीन धोरणानुसार अतिरिक्त बांधकामे नियमित करण्यासाठी वाढीव चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) लागू करण्यात आला आहे. या एफएसआयचा लाभ नागरिकांना मिळावा, यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत. ज्या नागरिकांनी परवानगीविना बांधकामे केली आहेत, त्यांना अतिरिक्त बांधकामे नियमित करुन घेणे सुकर होणार आहे. ही योजना नागरिकांसह प्रशासनासाठी लाभदायक ठरणारी आहे. शहरात एफएसआय लागू झाल्यामुळे काही वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या बांधकामधारकांना मोठा दिलासा मिळेल. उत्पन्नवाढीच्या अनुषंगाने शासनाने निर्णय घेतला असला तरी तो नागरिकांसाठी लाभदायक ठरणारा आहे. सहायक संचालक नगररचना विभागाकडे अतिरिक्त बांधकामे नियमित करुन घेण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शासन निर्णयानुसार अतिरिक्त बांधकामे नियमित करुन घेण्याची ही संधी आहे. ३१ जुलैपर्यंत बांधकामे नियमित करुन घेण्यात आली नाहीत तर ती जमीनदोस्त होतील.- चंद्रकांत गुडेवार,आयुक्त, महापालिका.
अतिरिक्त बांधकाम नियमित करण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत
By admin | Published: June 16, 2015 12:25 AM