लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ‘मोदी लाटे’तही भाजपच्या हाती येऊ न शकलेल्या तिवसा मतदारसंघावर भाजपक्षाची बारीक नजर आहे. तिवस्यात ‘कमळ’ फुलवायचेच, असा पणच जणू राज्यातील वरिष्ठ भाजप नेत्यांनी केला आहे. थेट प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण पोटे पाटील यांना रिंगणात उतरविण्याची रणनीती हे त्याच दृष्टीने टाकलेले पाऊल मानले जात आहे.राष्ट्रीय काँग्रेसच्या सचिव आणि प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्ष असलेल्या यशोमती ठाकूर यांचा तो मतदारसंघ आहे. यशोमती ठाकूर तेथून सलग दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व करीत असून, विधानसभा निवडणुकीत विदर्भातून निवडून आलेल्या त्या एकमेव महिला आमदार आहेत.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी तसेच कृष्णाची सासरवाडी असलेले कौंडण्यपूर तिवसा मतदारसंघातच आहेत. कधी काळी शिवसेनेच्या वाट्याला असलेला हा मतदारसंघ यशोमती यांनी काँग्रेसच्या ताब्यात घेतला. त्या मतदारसंघात दहा वर्षांत यशोमती ठाकूर यांना तुल्यबळ स्पर्धक निर्माण होऊ शकला नाही.सर्वाधिक १७ जणांनी तिवसा मतदारसंघातून उमेदवारीसाठी भाजपक्षाकडे दावा केला आहे. इच्छुकांची गर्दी खूप असली तरी ठोस चेहरा नसणे, ही भाजपक्षाच्या कोअर कमिटीची चिंता ठरली आहे. सर्व १७ इच्छुक भाजपक्षातील असल्यामुळे तिकीट त्यापैकी कुणालाही मिळाले तरी इतर इच्छुकांचा त्या उमेदवाराला विरोध हा होणारच. अंतर्गत कलहाला वाव न देता, यशोमती ठाकुरांना आव्हान देण्यासाठी भाजपक्षाने प्रवीण पोटे पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची खात्रीलायक बातमी आहे.पोटे पाटील हे पालकमंत्री राहिल्यामुळे त्यांचा राजकीय प्रभाव पक्षाला उपयोगी ठरू शकेल, शिवाय जिंकणे हा पक्षप्रतिष्ठेचा मुद्दा मानणाऱ्यांपैकी ते एक असतील.स्नेही राजकारणी आमने-सामने!भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण पोटे पाटील आणि काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष यशोमती ठाकूर हे राजकीय स्नेही आहेत. विरोधी पक्षांमध्ये राहूनही मैत्री निभावणारी ही मंडळी या विधानसभा निवडणुकीत अशा रीतीने आमने-सामने उभी ठाकेल, याचा विचार बहुदा त्यांनीही कधी केला नसावा.घोषणा का नाही?तिवसा मतदारसंघ हा शिवसेनेला हवा आहे. त्यासाठी अद्याप ओढाताण सुरू आहे. निर्णय झालेला नसल्यामुळे भाजपक्षाने प्रवीण पोटे पाटील यांच्या नावाची घोषणा करण्याची घाई केलेली नाही; तथापि पोटे यांनी तिवसा मतदारसंघात चाचपणी करून लोकसंपर्क सुरू केला आहे.प्रीती बंड यांचे होणार का शिफ्टिंग?बडनेरा मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवार असलेल्या प्रीती बंड यांना ऐनवेळी तिवसा मतदारसंघातून लढण्याचा आदेश शिवसेनेने दिला, तर त्यांचे शिफ्टिंग तिवस्यात होऊ शकेल. बडनेरा मतदारसंघात शिवसेना उमेदवार उभा करणार नसेल, तरच हे शिफ्टिंग होईल.
तिवस्यावरून रस्सीखेच सुरूच प्रदेश उपाध्यक्षांना लढविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2019 6:00 AM
राष्ट्रीय काँग्रेसच्या सचिव आणि प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्ष असलेल्या यशोमती ठाकूर यांचा तो मतदारसंघ आहे. यशोमती ठाकूर तेथून सलग दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व करीत असून, विधानसभा निवडणुकीत विदर्भातून निवडून आलेल्या त्या एकमेव महिला आमदार आहेत.
ठळक मुद्देभाजपची रणनीती : विदर्भातील एकमेव महिला आमदाराचा मतदारसंघ