अमरावती : राज्य विधिमंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीने दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात घेतलेल्या आढावा बैठकीच्या अनुषंगाने आणि विकासकामांना दिलेल्या भेटीदरम्यान आढळून आलेल्या त्रुटींच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळ सचिवालयाने ७ सप्टेंबर रोजी मंत्रालयात साक्ष नोंदविण्यासाठी बैठक बोलविली आहे. याकरिता जिल्हा परिषदेसह अन्य काही विभागांचे अधिकारी मुंबई वारीवर रवाना झाले आहेत.
राज्य विधिमंडळाचे अनुसूचित जाती कल्याण समितीने ५ ते ७ सप्टेंबर २०१८ रोजी अमरावती येथे आढावा बैठक घेतली होती. या बैठकीदरम्यान जिल्हा परिषदेसह अन्य विभागातील अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील अधिकारी व कर्मचारी यांची भरती, बढती, आरक्षण, अनुशेष आणि जात पडताळणी तसेच विविध योजनांचा आढावा घेतला होता. याशिवाय समितीचे पदाधिकारी तसेच सदस्यांनी जिल्ह्यात मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना क्षेत्रातील कामांना दिलेल्या भेटीत अनेक ठिकाणी त्रुटी दिसून आल्या होत्या. याअनषुंगाने विविधमंडळ सचिवालयाने साक्ष नोंदविण्यासाठी ७ सप्टेंबर रोजी मंत्रालयात बैठक बोलविली आहे. या बैठकीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कृषी विकास अधिकारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह अन्य काही विभागांचे प्रमुख अधिकारी मुंबईला रवाना झाले आहेत.