अमरावती : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता गत काही दिवसांपासून शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोना बांधित रुग्णांची संख्या चांगलीच वाढत आहे. त्यामुळे ज्या तालुक्यात रुग्णसंख्या अधिक आहे, अशा ठिकाणी कोविड केअर सेंटर वाढविण्याच्या हालचाली जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने सुरू केल्या आहेत. याकरिता सीईओ अविश्यांत पंडा गत दोन दिवसांपासून विविध आरोग्य केंद्र व कोविड केअर सेंटरला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील परिस्थितीची माहिती घेत आहे. कोरोनाबांधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ग्रामीण भागात कोविड केअर सेंटर वाढविण्यात येणार आहेत. त्याची तयारी सुरू झाली आहे.
गत काही दिवसांपासून मेळघाटातील धारणी, चिखलदरा, वरुड आणि मोशी या तालुक्यांत कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत; मात्र वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आता रुग्णालयातही बेड मिळणे कठीण झाले आहे. अशातच अनेक कोरोनासंक्रमित असलेल्या, मात्र गृह विलगीकरणात राहण्यास पुरेसी जागा नसल्याने अशा रुग्णांच्या सोईसाठी तसेच ज्या ठिकाणी कोरोनाबाधितांची संख्या मोठी आहे, अशा गावांतील रुग्णांकरिता जिल्हा परिषदेमार्फत कोविड केअर सेंटर सुरू केली जाणार आहेत. सध्या १४ तालुक्यांत कोविड केअर सेंटर सुरू असली तरी पुन्हा प्रत्येकी एक सेंटर सुरू केले जाणार आहे. त्यामुळे आता प्रत्येक तालुक्यात दोन कोविड केअर सेंटर सुरू केली जाणार आहेत. आजघडीला धारणी तालुक्यात नवीन कोविड सेंटर सुरू केले आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी कोरोधाबाधित असलेल्या रुग्णाच्या उपचारासाठी आवश्यक असलेली आरोग्य सुविधाही महत्त्वाच्या ठिकाणी सुरू केली जाणार आहे. यात रुग्णांकरिता लहान ऑक्सिजन सिलिंडर यासारख्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी सांगितले.
बॉक्स
ग्रामीण भागात कोरोनाबांधित रुग्णांची संख्या मेळघाटसह वरूड व मोशी तालुक्यात तसेच अन्य तालुक्यांतही वाढत आहे. त्यामुळे रुग्णांच्या सुविधेसाठी प्रत्येक तालुक्यात पुन्हा नवीन कोविड केअर सेंटर आवश्यकतेनुसार सुरू करण्यात येणार आहेत. याकरिता प्रशासनाकडून त्यासाठी नियोजन सुरू आहे.
अविश्यांत पंडा
मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद