विनाअनुदानित शिक्षकांचे उपोषण : बी.टी.देशमुख करणार चर्चाअमरावती : विनाअनुदानित शाळांचे शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मागील सात दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू केले असून दिवसेंदिवस आंदोलनाची तीव्रता वाढतच चालली आहे. मंगळवारी येथील शिक्षण उपसंचालक कार्यालय ते मध्यवर्ती बसस्थानक परिसरात ‘थाळीनाद’ करून शिक्षकांनी शासन, प्रशासनाचे लक्ष वेधले.अमरावती विभागातील विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी १ जूनपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मात्र या आंदोलनाची राज्य शासनाने फारशी दखल घेतली नसल्याने मुंडन, रक्तदान व मूकमोर्चा अशी प्रतिकात्मक आंदोलनांची श्रुंखलाच सुरू करण्यात आली आहे. त्याच श्रुंखलेत हे थाळीनाद आंदोलनही करण्यात आले. यापूर्वी आंदोलनस्थळी पालकमंत्री प्रवीण पोटे, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, आ.बच्चू कडू, आ.श्रीकांत देशपांडे आदींनी भेटी देऊन शिक्षकांच्या व्यथा जाणून घेतल्या. परंतु उपोषणाचा सातवा दिवस असतानादेखील आतापर्यंत शासन, प्रशासनस्तरावर कोणत्याच हालचाली झाल्या नाहीत. परिणामी मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीच्या बॅनरखाली बसस्थानक परिसरात शिक्षकांनी ताट वाजवा आंदोलन करुन शासनाचे लक्ष वेधले. शासनाने शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक पाऊल न उचलल्यास विभागातील शिक्षक आत्महत्या करतील, असा इशारा देण्यात आला आहे. तासभर चाललेल्या ताट वाजवा आंदोलनात शिक्षक आणि संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनामुळे काही वेळ बसस्थानक परिसरातील वाहतूक खोळंबली होती. एकिकडे थाळीनाद, तर दुसरीकडे बेमुदत उपोषण असे दुहेरी आंदोलन करून अन्यायग्रस्त शिक्षकांनी त्यांच्या व्यथा मांडल्यात. यावेळी गगनभेदी नारेबाजी करून शिक्षकांनी त्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले. या आंदोलनात काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके, शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शेखर भोयर, कायम विना अनुदानित कृती समितीचे पुंडलिकराव रहाटे, प्रवीण रघुवंशी, सतेश्वर मोरे, भोजराज काळे, विलास राऊत, ब्राह्मणे, सुधाकर वाहुरवाघ, दीपक धोटे, सुरेश शिरसाट, पठाण सर, गोपाल चव्हाण, अशोक लहाने, बाळकृष्ण गावंडे, गाजी जहरोश, नितीन टाले, अनिल पंजाबी, मनोज कडू, संगीता शिंदे, गजेंद्र गावंडे, अरुण भोयर, दिलीप उगले, मोहन ढोके, विस्मय ठाकरे, अब्दूल राजीक, प्रवीण कराळे, मोहन पांडे, प्रदीप पुंड आदी उपस्थित होते. आंदोलनस्थळी जि. प. च्या माजी अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांनी भेट दिली. कायम अनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाने आता अधिक उग्र रूप धारण केले असून उपोषणाच्या जोडीला नवनवीन आंदोलनांची जोड दिली जात आहे.आता माघार नाही - शेखर भोयरमागील सात दिवसांपासून शिक्षकांचे बेमुदत उपोषण सुरू असताना याची शासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे शिक्षकांप्रती शासन उदासीन असल्याचे दिसून येते. परिणामी शिक्षकांना त्यांचे हक्क मिळाल्याशिवाय आता माघार नाही, अशी रोखठोक भूमिका शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शेखर भोयर यांनी घेतली आहे.माजी आमदार बी.टी.देशमुखांच्या भूमिकेकडे लक्षमागील ७ दिवसांपासून विनाअनुदानित शाळा शिक्षक व कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. बुधवारी ८ जून रोजी माजी आमदार बी.टी.देशमुख हे उपोषण मंडपाला भेट देऊन अन्यायग्रस्त शिक्षकांच्या व्यथा जाणून घेतील, असे विमाशीचे प्रवीण रघुवंशी यांनी सांगितले. शिक्षकांच्या प्रश्नांची जाणीव, तळमळ असलेल्या बी. टी. देशमुखांच्या भूमिकेकडे आंदोलक शिक्षकांचे लक्ष लागले आहे.
थाळीनाद करून शासनाचे वेधले लक्ष!
By admin | Published: June 08, 2016 12:03 AM