अमरावती : दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी साजरा होणाऱ्या शिक्षकदिनी विद्यार्थी शिक्षकांप्रती आपल्या भावना व्यक्त करतात. कोरोनामुळे यंदा असे कार्यक्रम होणार नाहीत. मात्र, विद्यार्थ्यांनी त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी शासनाने ‘थँक्स ए टिचर’ अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. याचा प्रारंभ झाला असून, हे अभियान जिल्हाभरात २ ते ७ सप्टेंबरपर्यत चालणार आहे.
या अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन व ऑफलाईन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ‘माझा आवडता शिक्षक, शिक्षिका’ हा विषय वक्तृत्व स्पर्धेसाठी देण्यात आला आहे. ‘शिक्षक दिन’ या विषयावर चित्र ‘मी शिक्षक झालो तर किंवा मी शिक्षिका झाले तर’ या विषयावर काव्य वाचन आणि निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे. सहावी ते आठवीपर्यंच्या विद्यार्थ्यांसाठी ‘माझा शिक्षक माझा प्रेरक’ या विषयावर निर्बंध कोविड कालावधीतील शिक्षकांची भृूमिका या विषयावर वक्तृत्व माझा जीवनातील शिक्षकांचे स्थान या विषयावर स्वरचित कविता आणि उपक्रमशील शिक्षक या विषयावर काव्य वाचन स्पर्धा अशा विविध स्पर्धा होणार आहेत. या उपक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जि.प. प्राथमिक शिक्षणाधिकारी एजाज खान यांनी केले आहे.