अमरावती - दोन दिवसांपुर्वी मृतावस्थेत आढळलेल्या व्यक्तीच्या मृत्यूप्रकरणी नागपुरी गेट पोलिसांनी महिला व पुरूष अशा दोघांविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल केला. ४ मार्च रोजी रात्री ११.२३ च्या सुमारास गुन्हा नोंदवून दोघांनाही अटक करण्यात आली.
रमजान खान रहमान खान (५४, इरफाननगर, लालखडी) असे मृताचे नाव आहे. २ मार्च रोजी सकाळी आठच्या सुमारास रमजानखान यांचा मृतदेह आरोपीच्या घराशेजारी बिस्मिल्लानगर येथे रक्तबंबाळ स्थितीत दिसून आला होता. त्याप्रकरणी, मृताचा मुलगा मोहिनखान (२४) याच्या तक्रारीवरून नागपुरी गेट पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली होती. मात्र तपासादरम्यान तो खून असल्याची कुणकुण लागताच पोलिसांनी तपासाची सुत्रे फिरविली. व ४८ तासाच्या खुनाचा छडा लावत आरोपींना जेरबंद करण्यात ठाणेदार पुंडलिक मेश्राम यांची ‘टिम नागपुरी गेट’ ला यश आले. आरोपी नसीरोद्दीन नईमोद्दीन (५५, बिसमिल्लानगर) व एका महिलेला याप्रकरणी अटक करण्यात आली. सहायक पोलीस आयुक्त पुनम पाटील यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार मेश्राम यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन सुक्ष्म तपास चालविला होता.
असा लागला छडा
रमजान खान हा भंगार खरेदी विक्रीचे काम करीत होता. रमजान खान हा आरोपी नसीरोद्दीन नईमोद्दीन याला मजुरीकरीता न्यायचा. त्यामुळे त्याचे आरोपीच्या घरी येणे जाणे होते. अशातच एका महिलेशी रमजान खानचे सूत जुळले. त्यांच्यात अनैतिक संबंध देखील प्रस्थापित झाले. १ मार्च रोजी रात्री १० नंतर रमजानखान हा नसीरोद्दीन नईमोद्दीनच्या घरी गेला. तेथे त्यांच्यात कडाक्याचा वाद झाला. त्या दरम्यान नसीरोद्दीन नईमोद्दीनने एका महिलेशी संगणमत करून रमजान खान याच्या कपाळावर, उजव्या कानाच्या बाजुला हत्याराने वार केले. तथा त्याला जीवानिशी ठार करून शेजारच्या पडक्या घरात टाकून दिले.
आकस्मिक मृत्युचा तपास करतेवेळी संशयावरून एकाला ताब्यात घेतले. त्याने खुनाची कबुली दिली. याप्रकरणी त्याच्यासह एका महिलेविरूध्द देखील खुनाचा गुन्हा दाखल केला. आरोपीच्या घरी रक्ताचे डाग आढळले होते.
पुंडलिक मेश्राम, ठाणेदार, नागपुरी गेट