वेडसर महिलेला सोडले वाऱ्यावर : इर्विन दवाखान्यातील प्रकारअमरावती : विभागीय क्रीडा संकुलासमोरील रस्त्यावर निर्वस्त्र व जखमी अवस्थेत झोपून असलेल्या एका वेडसर महिलेला पोलिसांनी उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. मात्र, त्या महिलेने प्रतिसाद न दिल्यामुळे पोलिसांनी तिला वाऱ्यावर सोडून दिले. यावरून हीच का महिला पोलिसांची माणुसकी, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. शनिवारी सकाळी ११ वाजता एक तरुण वयातील वेडसर महिला संकुलासमोरील कचरा फेकफाक करीत होती. दरम्यान तिने अंगावरील कपडेसुद्धा काढून फेकले. त्यानंतर ती रस्त्यावरच अर्धनग्न अवस्थेत झोपली. हा प्रकार पाहून नागरिकांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती कोणाचेही ऐकून घेत नव्हती. दरम्यान एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने तत्काळ गाडगेनगर पोलीस ठाणे गाठून याबाबत माहिती दिली. "लोकमत" कार्यालयामधूनही वेडसर महिलेबाबत पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली. मात्र,तासाभरानंतरही पोलीस घटनास्थळी पोहोचले नव्हते. कोणतीही अप्रीय घटनेची शक्यता नाकारता येत नव्हती. अखेर तासाभरानंतर दामिणी पथक विभागीय क्रीडा संकुलासमोर पोहोचले. पीएसआय उंबरकर यांच्यासह अन्य एका महिला पोलिसांनी त्या महिलेची समजूत घातली. तिला कपडे देऊन तिचे अंग झाकल्याने माणुसकी दाखविली. तिला वाहनात बसवून जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. मात्र, ती वाहनाच्या खाली उतरत नव्हती. १० ते १५ मिनिट पोलिसांनी वेडसर महिलेला वाहनाबाहेर काढण्याचे प्रयत्न केले. मात्र, ती बाहेर निघाली नाही. अखेर वेडसर महिलेच्या त्रासाला कंटाळून दामिणी पथकाने त्या वेडसर महिलेला जबरीने बाहेर काढून तसेच सोडून दिले. तेथून ती महिला कुठेतरी निघून गेली. त्या महिलेला उपचाराची आवश्यकता होती. तिला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होते. मात्र, पोलिसांनी सुरुवातीला दाखविलेली माणुसकी शेवटपर्यंत टिकून राहिली नाही. जर आता पुढे त्या महिलेसोबत काही अप्रीय घटना घडल्यास पोलीस गुन्हा दाखल करून तपास करेल, हे वास्तव आहे. (प्रतिनिधी)
हीच का महिला पोलिसांची माणुसकी
By admin | Published: April 30, 2017 12:07 AM