अमरावती : स्वच्छतेचे महान पुजारी वैराग्यमूर्ती श्री संत गाडगेबाबांचा ६७ वा पुण्यतिथी महोत्सव १४ ते २१ डिसेंबरपर्यंत विविध कार्यक्रमांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आले आहे. शहरातील श्री संत गाडगेबाबांच्या समाधीस्थळी गाडगेबाबानगर येथे गाडगेबाबांचा ६७ पुण्यतिथी महोत्सवाला १४ डिसेंबरपासून प्रारंभ झाला आहे. सकाळी १० वाजता बाबांच्या समाधीचे पूजन महापालिका आयुक्त देवीदास पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
आठवडाभर दररोज सकाळी १०.३० ते १२.३० व दुपारी २ ते ४.३० या वेळेत श्रीमद् भागवत कथा पठण पंकज महाराज पोहोकार करीत आहेत. दररोज दुपारी १२.३० अंध अपंगांना अन्नदान, दररोज दुपारी १ वाजता महिला भजनी मंडळाचा भजनगायन कार्यक्रम, दररोज दुपारी ४.३० वाजता बावणे गुरुजी यांचे गाडगेबाबांच्या जीवनकार्यावर प्रवचन, सायंकाळी ५.३० वाजता हरिपाठ, तर ६.३० वाजता सामुदायिक प्रार्थना होत आहे. सायंकाळी ७.३० वाजता शाहीर मुरलीधर लोणागरे यांचा पोवाडा होत आहे.
शुक्रवारी सांयकाळी ९ वाजता हभप नारायण महाराज पडोळे (निंभी) यांचे राष्ट्रीय कीर्तन सादर होईल. अनुयायांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री संत गाडगेबाबा ट्रस्टचे विश्वस्त बापूसाहेब देशमुख, व्यस्थापक प्रकाश महात्मे, प्रसिद्धिप्रमुख गजानन देशमुख, मंगेश वानखडे यांनी केले आहे.