विनोद देशमुख
अमरावती : पूर्णानगर येथे शेतात सोयाबीन उगवले नसल्याने चौकशीला आलेल्या कृषी अधिकाऱ्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिली. या प्रकारामुळे संतप्त शेतकऱ्यांनी त्यांना पाच तास ग्रामपंचायतमध्ये कोंडून ठेवले. दरम्यान, आसेगाव पोलिसांच्या मध्यस्थीने अधिकाऱ्यांना रात्री उशिरा सोडण्यात आले.
भातकुली तालुका अंतर्गत येणाऱ्या पूर्णा नगर येथे राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना महाबीज सोयाबीन बियाणे अनुदानावर कृषी केंद्रामार्फत ६१२ जातीचे सोयाबीन खरेदी करण्यात आले. आठ दिवस उलटूनही बियाणे उगवले नाही. १३ जुलै रोजी दुपारी तक्रारकर्ता शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन अधिकाऱ्यांनी पाहणी केली.
बियाणे खोल पडले तर दडपू शकते. यावर वरिष्ठ अधिकारी निर्णय देतील, असे उडवाउडवीचे उत्तर दिल्याने संतप्त शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी प्रमोद खर्चान, कृषी पर्यवेक्षक अमोल सराड, क्षेत्र अधिकारी विद्यासागर उईके, कृषी सहायक अलका जाऊरकर भातकुली कृषी अधिकारी अश्विनी चव्हाण यांना कोंडले होते.