अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘पॉवरगेम’मध्ये बुधवारी कोण, कुठल्या बैठकीला उपस्थित राहणार, याचीच चर्चा सुरू होती. दुपारनंतर चित्र स्पष्ट झाले. जिल्ह्यातील ज्येष्ठांचा कल खा. शरद पवार यांच्याकडे, तर तरुणाईला भावले दादा, असेच निदर्शनास आले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर चार दिवसांपासून जिल्ह्यातील कुणाचा कल कुणाकडे, याचा सस्पेन्स कायम होता. काहींनी पत्ते ओपन केले, तर कोणी काठावर होते. मात्र, बुधवारी मुंबईत झालेल्या दोन्ही गटांच्या बैठकीला जिल्ह्यातील काही पदाधिकारी उपस्थित राहिल्याने आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. अजितदादांनी उपमुख्यमंत्रिपदाची व अन्य आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या घटनेनंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस सरळ दोन गटांत विभागली गेली. या दोन्ही गटांकडून बुधवारी मुंबईत शक्तिप्रदर्शन झाले. त्यामध्ये जिल्ह्यातील कोण पदाधिकारी उपस्थित राहतात, याचीच चर्चा सुरू होती. यामध्ये काही नेत्यांनी त्यांचा कल कुणाकडे हे स्पष्ट केले, तर काही चुप्पी साधून होते. काहींचे मोबाइल स्विच ऑफ होते.
खा. शरद पवार यांच्या बैठकीला उपस्थित
आमदार देवेंद्र भुयार, हर्षवर्धन देशमुख, शरद तसरे, सुनील वऱ्हाडे, संगीता ठाकरे, प्रकाश नाना बोंडे, अजिज पटेल, अनिल ठाकरे, गणेश रॉय, राजेंद्र महल्ले, भास्कर ठाकरे, प्रदीप राऊत, शरद देवरणकर, प्रदीप येवले, नितीन ढोके, तेजस्विनी बारब्दे यांच्यासह काही पदाधिकारी व कार्यकर्ते.
अजित पवार यांच्या बैठकीला
संजय खोडके, सुरेखा ठाकरे, प्रशांत डवरे, अविनाश मार्डीकर, संतोष महात्मे, भोजराज काळे, ऋतुराज शिरभाते, दिलीप कडू, प्रशांत ठाकरे, राजू कोरडे, प्रमोद महल्ले, किशोर देशमुख, किशोर भुयार, सनाउल्लाखान, संध्या वानखडे, दिलीप शिरभाते, अबरारभाई यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते.