शिरजगाव कसबा (अमरावती) : ६ जुलैला लग्न ठरलेली १९ वर्षीय नियोजित वधू ५ जुलैच्या सायंकाळी बेपत्ता झाली होती. तिचा मृतदेह विहिरीत मंगळवारी शेतातील विहिरीत आढळला. माझ्या मुलीची हत्या झाली आहे, असा आरोप संजय नेवारे या पित्याने याप्रकरणी शिरजगाव कसबा पोलिसांकडे केला आहे.
तक्रारीनुसार, शिरजगाव कसबामध्ये गोवारीपुरा भागांमध्ये राहणारे संजय सदाशिव नेवारे यांना एक मुलगी व मुलगा आहे. त्यांची मुलगी साक्षी (१९) हिचे लग्न ६ जुलैला ठरले हाेते. ५ जुलैला सकाळी ४ ते ५ दरम्यान ती घराबाहेर गेली. तथापि, तिचा मोबाइल हा घरीच होता. त्यामुळे ती कुठे बाहेर गेली असेल, असा कुटुंबीयांचा समज झाला. त्याच दिवसापासून ती दिसून न आल्यामुळे संजय नेवारे यांनी शिरजगाव पोलिसात तक्रार दाखल केली. नातेवाइकांनीही शोध घेतला.
दरम्यान, १२ जुलैला गाेवारीपुराच्या मागील बाजूस असलेल्या नारायण पोटे यांचे शेतातील विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला ठाणेदार प्रशांत गिते यांना माहिती दिली असता, पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह बाहेर काढला. मुलीच्या अंगावर अर्धवट कपडे व जीभ बाहेर आली असल्याचे आढळले. याप्रकरणी पित्याच्या तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.