अमरावती : पैसे मोजून शुभमंगल करायचे अन् लग्न होताच नवरी ‘सावधान’! असे काहीसे प्रकार शहर तथा जिल्ह्यात घडू लागले आहेत. अनेक घटनांमध्ये केवळ बदनामी नको म्हणून पोलिसांत तक्रारी केल्या जात नाहीत. त्यासाठी कुणी फारसे धजावत नाही. मात्र, अलीकडे अशाच एका प्रकरणात दीड लाख रुपये घेऊन पोबारा केलेल्या नववधूसह मध्यस्थ व इतरांविरुद्ध बडनेरा पोलिसांनी गुन्हे नोंदविले.
आज अनेक जाती - समूहांमध्ये उपवर मुलींची वानवा आहे. त्यामुळे अनेक जण दलालांच्या, मध्यस्थांच्या भूलथापांना बळी पडतात. मुलगी गरीब घरची असली तरी चालेल. मात्र, मुलाचे हात तर पिवळे होतील, अशा वरपित्याच्या काकुळतीच्या स्वराचा गैरफायदा घेतला जातो. लग्न होताच नवरी दागदागिने व रोख रक्कम घेऊन पोबारा करते. त्यामुळे अशा बतावणीला, भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
लग्नासाठी मुली मिळेनात
आज अनेक समाजांमध्ये मुलींचे प्रमाण अत्यल्प आहे. मुलींंचा जन्मदरदेखील मुलांच्या तुलनेत कमी असल्याने उपवर मुली मिळेनाशा झाल्या आहेत. अनेकदा मुलींकडूनही अपेक्षा व्यक्त केल्या जातात, तर मुलगी सुस्वरूप हवी, यासह अनेक अपेक्षा असल्यानेदेखील मुली मिळणे दुरापास्त झाले आहे.
लग्नासाठी अनोळखीला पैसे देऊ नका
लग्नासाठी अनोळखी व्यक्तिला पैसे दिल्यास हमखास फसवणूक होते. तशा घटना घडल्या आहेत. मध्यस्थाला पैसे देऊन खरोखर लग्न जुळतात का, याचा विचार करावा.
कोठून आणल्या जातात मुली?
परराज्यातून अशा मुली आणल्या जातात. केवळ लग्नाचे नाटक करण्यासाठी त्या मुलींना निश्चित असा मेहनताना दिला जातो. काम झाले की, त्या रफुचक्कर होतात.
पैसे दिले, लग्न झाले, त्याच दिवशी नवरी गायब
दिव्यांग मुलाच्या विवाहासाठी उपवर मुलगी आहे; पण ती गरिबाची असल्याने तिला दीड लाख रुपये द्यावे लागतील, अशी बतावणी करून एका उपवर पित्याला दीड लाख रुपयांना ठकविण्यात आले. या दोन तासांच्या ‘फेक मॅरेज’साठी तोतया नवरीदेखील उभी करण्यात आली. लग्न झाल्यानंतर दोन तासांमध्ये दीड लाख रुपये घेताच बनावट नवरीसह चौघांनी पळ काढला. २२ एप्रिल रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास ते ‘फेक मॅरेज’ झाले. याप्रकरणी वरपित्याच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी २६ एप्रिल रोजी रात्री १२.०९ वाजता असलम मिया शेरूमिया (५०, रा. बेगम बाग कॉलनी, उज्जैन, मध्य प्रदेश), हर्षद दिलीप अलोने (३३, कृषक कॉलनी, अमरावती) व दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पैकी हर्षद अलोने याला अटक करण्यात आली होती.
उपवर पित्यांनी सजग राहावे
लग्न झाल्यानंतर अवघ्या दोन तासात ‘ती’ नवरी दीड लाख रुपये घेऊन पसार झाली. त्याप्रकरणी बडनेरा पोलिसांनी त्या बनावट नवरीसह मध्यप्रदेशातील व स्थानिक मध्यस्थांविरुद्ध गुन्हे नोंदविले होते. उपवर व त्यांच्या पालकांनी सजग राहायला हवे.
- डॉ. आरती सिंह, पोलीस आयुक्त