मोर्शी (अमरावती) : आंतरजातीय विवाह करून सासरी आलेल्या नवरीला माहेरच्या मंडळींनी फरपटत नेले होते. मात्र, ती सासरी जाण्याबाबत ठाम असल्याने अखेर बयाणानंतर पोलिसांनी सामंजस्य प्रस्थापित करीत तिला नवऱ्याच्या स्वाधीन केले. तालुक्यातील अंबाडा येथील हे विवाहित जोडपे आता सुखाने नांदावे, अशी सदिच्छा जिल्हाभरातून व्यक्त होत आहे.
अंबाडा येथे ४ मे रोजी एका युवकाने पत्नीला तिच्या माहेरच्या मंडळींनी फरपटत नेल्याची फिर्याद मोर्शी पोलीस ठाण्यात दिली होती. फिर्यादीनुसार, मोर्शी येथील एका कनिष्ठ महाविद्यालयात सावरखेड येथील युवती शिकत होती. अंबाडा येथील तिच्या मैत्रिणीच्या भावाशी तिची मैत्री व हळूहळू त्याचे रूपांतर प्रेमात झाले. या प्रेमीयुगुलाने २८ एप्रिल रोजी आर्य समाजमंदिरात लग्न केले. ३ मे रोजी मुलीने वडिलांना फोन केला. ४ मे रोजी सासरी कथा आयोजित केली आहे, तुम्ही या, असे सांगितले. वडिलांसह तिच्या नातेवाइकांनी अंबाडा येथे जाऊन मुलीला परत चल, तुझे लग्न दीडशे ते दोनशे लोकांमध्ये रीतीरिवाजाप्रमाणे करून देतो, असे सांगितले. त्याला नकार मिळताच संतप्त नातेवाइकांनी मुलीला घरातून बाहेर आणले. यादरम्यान सासर व माहेरच्या मंडळींमध्ये गुद्दागुद्दी झाली आणि ते मुलीला घेऊन निघून गेले.
दरम्यान, माहेरच्या मंडळींविरुद्ध तक्रार प्राप्त होताच ठाणेदार श्रीराम लांबाडे यांनी तपासचक्रे फिरवली. वडिलांनी मुलीला एका नातेवाइकाकडे ठेवले असल्याच्या गोपनीय माहितीवरून मोर्शी पोलिसांनी ७ मे रोजी रात्रीच्या सुमारास ते ठिकाण गाठून मुलीचे बयाण नोंदविले. मी स्वमर्जीने लग्न केले. घडलेल्या प्रकारात माझ्या आई-वडिलांचा दोष नाही; पण मी माझ्या पतीसोबतच राहणार, असे तिने पोलिसांना सांगितले. अखेर अंबाडा येथील नवरोबाला पोलिसांनी ठाण्यात बोलावले व एकत्र नांदण्याची तंबी देत ८ मे रोजी नवरी त्याच्या स्वाधीन केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल ठाकरे, उपनिरीक्षक विजय लेव्हलकर, कॉन्स्टेबल संदीप वानखडे, नाईक विष्णू पवार पुढील तपास करीत आहेत.