अमरावती : शहरात डेग्यू, अस्वच्छतेचा कहर माजला आहे. साथीच्या आजारांनी सार्वजनिक, खासगी रुग्णालये हाउसफुल्ल असे चित्र असताना महापालिका प्रशासनाकडून उपाययोजना शून्य आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी शुक्रवारी घेतलेल्या आढावा बैठकीत शहरातील अस्वच्छता, सफाई कर्मचारी गैरहजर, कचरा कंटेनर आणि स्वच्छता कंत्राटदाराच्या मनमर्जी कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. एका प्रभागात स्वच्छतेसाठी दरमहा ८ ते ९ लाखांचे देयके दिले जात असेल तर सामान्य नागरिकांची ओरड का? असा संतप्त सवाल आयुक्तांच्या पुढ्यात उपस्थित केला.
आयुक्तांच्या दालनालगतच्या सभागृहात पार पडलेल्या आढावा बैठकीत आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी नाल्या सफाई, कचरा संकलन, कंटेनर, डास निर्मूलन फवारणी, सफाई कर्मचारी गैरहजर अशा एक ना अनेक विषयांवर बोट ठेवले. दरम्यान स्वच्छतेसंदर्भात प्रभागनिहाय आढावा घेताना त्यांनी प्रश्नांची सरबत्ती करून आराेग्य निरीक्षक, कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांची बोलती बंद केली. यावेळी बहुतांश प्रभागातील मूळ स्वच्छता कंत्राटदार गायब असल्याचे दिसून आले.
आढावा बैठकीला आयुक्त देवीदास पवार, भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, माजी महापौर संजय नरवणे, उपमहापौर चेतन पवार, सचिन रासने, जयंत डेहनकर, सुनील काळे, संध्या टिकले, राधा कुरील, सुरेखा लुंगारे, बलदेव बजाज, कुसुम साहू यासह उपायुक्त मेघना वासनकर, स्वास्थ्य अधीक्षक श्रीकांत डवरे, योगेश पिठे, नंदकिशोर तिखिले, धनंजय शिंदे आदी उपस्थित होते.
- तर कंटेनरचे तीन कोटी परत करा
शहरात नाल्या तुंबल्या. कचरा साचला. १० ते १५ दिवसांपर्यंत कचरा उचलला जात नाही. कचरा संकलन करणाऱ्या वाहनांची बोंबाबोंब आहे. घंटागाडी दिसत नाही. प्रभागातील आरोग्य निरीक्षक, सफाई कर्मचारी गायब असतात. त्यामुळे डीपीसीतून महापालिकेला कंटेनर खरेदीसाठी दिलेले तीन कोटी रुपये परत करा, असे म्हणत महापालिका प्रशासनाच्या कारभारावर आमदार प्रवीण पोटे पाटील कडाडले.
शहर स्वच्छ हवे; अन्यथा काम सोडा
दैनंदिन स्वच्छता कंत्राटदारांची गत पाच महिन्यांपासून देयके थकीत असल्याचा मुद्दा आमदार पोटे पाटील यांच्यासमोर उपस्थित झाला, तेव्हा अगोदर शहर स्वच्छ ठेवा; अन्यथा काम सोडा, असा सल्लाही त्यांनी कंत्राटदारांना दिला. दरारोज ५५ कर्मचारी हजेरीपत्रकात दर्शविले जातात. मुळात १० ते १५ कर्मचारीच कर्तव्यावर असतात. या विषयाला दोषी कोण? असे म्हणत त्यांनी महापालिकेने तुमचे पैसे बुडविले नाहीत. आज नाही तर उद्या मिळतील; पण अगोदर स्वच्छतेचे काय? याचा विचार करा, असे आयुक्त देवीदास पवार यांना ते म्हणाले.
...अन् आयुक्तांना दाखविले अस्वच्छेतेचे छायाचित्र
आमदार प्रवीण पोटे पाटील हे महापालिकेत आढावा घेणार असल्याने भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांना त्यांच्या भागातील अस्वच्छता, कचऱ्याचे ढीग, नाल्यांची वस्तुस्थिती दर्शविणारी छायाचित्रे सोबत आणण्याचे कळविले होते. त्यानुसार शहरातील सर्वच प्रभागांतून भाजप कार्यकर्त्यांनी सोबत आणलेली छायाचित्रे आयुक्त पवार यांना दाखवीत शहराचा हा बोलका आरसा आहे, असे म्हणत आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी प्रशासनाची पोलखोल केली.
तत्कालीन आयुक्तांवरही तोंडसुख?
तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या कारनाम्याची यादी वाचताना त्यांनी अमरावती महानगर कसे मागे नेले, यावरून आमदार प्रवीण पोटे पाटील प्रचंड संतापले. कर्मचारी काम नाही करत, तर दुसरी व्यक्ती नियुक्त करा. स्वच्छता झाली पाहिजे. कंत्राटदारांना काम जमत नसेल, तर सोडून द्या, लीडरशिप करू नका, असेही ते म्हणाले. कंत्राटदार न्यायालयात गेल्याच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन आयुक्त आष्टीकर यांच्यावर त्यांनी चांगलेच तोंडसुख केले.