अमरावती : चांदूर रेल्वे पंचायत समितीअंतर्गत सातेफळ गणासाठी आयोगाद्वारा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम मंगळवारी जाहीर करण्यात आला. त्यामुळे या गणातील सर्व गावांमध्ये आचारसंहिता लागू झाली. २८ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्जप्रक्रियेला प्रारंभ, तर १७ डिसेंबरला मतदान होणार आहे.
सातेफळ गण हे सर्वसाधारण (स्त्री) राखीव आहेत. येथील सदस्य श्रद्धा वऱ्हाडे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झाले होते. पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला होता. यामध्ये आक्षेप निरंक असल्याने २४ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. दरम्यान २१ नोव्हेंबरला आयोगाद्वारा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याने राजकीय हालचाली गतिमान होत आहेत.आयोगाच्या कार्यक्रमानुसार २८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्जाची प्रक्रिया राहील. ५ डिसेंबरला उमेदवारी अर्जांची छाननी, ११ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्जाची माघार घेता येईल. १७ डिसेंबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान व १८ ला सकाळी १० पासून मतमोजणी सुरू होणार असल्याचे जिल्हा निवडणूक विभागाने सांगितले.