लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत आतापर्यंत ७ लाख १६ हजार ९०५ लाडक्या बहिणींनी अर्ज दाखल केले आहेत. यामधून ६ लाख ९९ हजार ७१६ अर्ज मंजूर केलेले आहेत. तर ७५ हजार २११ लाडक्या बहिणींचे आधार सिडिंग न झाल्याने त्यांचे अद्यापही पैसे जमा झाले नाहीत.
याशिवाय १० हजार ३३० अर्ज पडताळणीमध्ये आहेत. अशातच आता मंगळवारी दुपारी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने या संपूर्ण प्रक्रियेला ब्रेक लागला आहे. त्यामुळे प्रतीक्षेतील महिला लाभार्थीच्या खात्यात २३ नोव्हेंबरनंतरच अनुदान जमा होणार आहे. सोबतच आता नव्याने अर्ज भरण्याची प्रक्रिया बंद करण्यात आली आहे. याबाबत राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाच्या सचिवांनी बुधवारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या घेतलेल्या व्हिसीवरील सभेत सूचना दिलेल्या आहेत.
जिल्ह्यात पहिल्या टप्प्यामध्ये नारीशक्ती अॅपवर ३ लाख ९८ हजार ३४१ महिलांनी अर्ज केले होते. त्यानंतर अंगणवाडी सेविकांच्या पोर्टलवरून ३ लाख १ हजार ४२ महिलांनी पुन्हा या योजनेकरिता नोंदणी केली आहे. त्यामुळे आतापर्यंत ७ लाख १६ हजार ९०५ महिलांनी लाडकी बहीण योजनेकरिता अर्ज केले आहेत. यापैकी आतापर्यंत ६ लाख ९९ हजार ७१६ महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. यापैकी ४ हजार ३६३ महिलांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत. तर १०,३३० हजारांवर अर्ज पडताळणीमध्ये आहेत. अशातच जिल्ह्यात अद्यापही ७५ हजार २११ महिलांचे आधारकार्ड बँकेला संलग्न नसल्याने त्यांचे अनुदान रखडले आहे. त्यामुळे त्यांचे सिडिंग झाल्यानंतर बँक प्रक्रियेतील अनुदान त्या लाभार्थीना प्राप्त होईल; परंतु नव्याने अर्ज करणे व पुढील टप्पा याशिवाय त्रुटीत असलेल्या अर्जाची पडताळणी प्रक्रियेला मात्र आचारसंहितेमुळे आता ब्रेक लागला आहे, त्यामुळे सध्या तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला ब्रेक लागला आहे.