लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : गेल्या २४ तासात शहरात तीन तरूणांचा खून करण्यात आला. त्यातील एकाची ओळख अद्याप पटली नसली तरी, तीनही घटनेत चायना चाकुचा वापर करण्यात आल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे जयस्तंभ ते रेल्वे स्टेशन पुलावर झालेल्या खुनाच्या घटनेतील पाचही मारेकरी अल्पवयीन आहेत. तर दुसरीकडे अकोला टी पॉईंटजवळ सोमवारी सायंकाळच्या सुमारास अंदाजे ३० वर्षे वयोगटातील तरुणाचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आला. त्याचीदेशील ओळख पटली नाही.
मसानगंजमध्ये तरुणाची निघृण हत्या
नागपुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मसानगंज येथे एका २४ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून निघृण हत्या करण्यात आली. सोमवार, ७ ऑक्टोबर रोजी दुपारी ११:३० च्या सुमारास जुन्या वादातून मसानगंजस्थित मनपा शाळा क्रमांक २ जवळ ती घटना घडली. वैभव हुकूमचंद पटारिया (वय २४, चेतनदास बगीचा, मसानगंज) असे मृताचे नाव आहे.
याप्रकरणी नागपुरी गेट पोलिसांनी सोमवारी रात्री आरोपी शुभम गोपाल मोहोड (२४, रा. महेंद्र कॉलनी) व अन्य तीन ते चारजणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. वैभव पटारिया व शुभम मोहोड यांच्यात जुन्या वादातून वैमनस्य होते. दरम्यान, सोमवारी सकाळी वैभव हा शाळेजवळ असताना शुभम मोहोड व त्याच्या साथीदारांनी अचानक वैभववर हल्ला चढविला, आरोपींनी वैभववर चाकूने वार केले. तो रक्तबंबाळ स्थितीत जमिनीवर कोसळताच आरोपींनी घटनास्थळाहून पळ काढला, तर दुसरीकडे काही प्रत्यक्षदर्शीनी वैभवला जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. उपचारादरम्यान थोड्याच वेळात त्याचा मृत्यू झाला. माहिती मिळताच नागपुरी गेट पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा करून पुढे गुन्हा दाखल केला. आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह उचलणार नाही, असा पवित्रा वैभवच्या कुटुंबांनी घेतला. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात मोठा तणाव निर्माण झाला, कोतवालीचे ठाणेदार मनोहर कोटनाके यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले. तथा आरोपींना अटक करण्याची ग्वाही दिली. त्यानंतर तो तणाव निवळला. दरम्यान नागपुरी गेट पोलिसांनी आरोपी शुभम मोहोडला अटक केली आहे.
अंजनगाव-बारी मार्गावर मृतदेह, हत्याच?अमरावती: बडनेरा ठाण्याच्या हद्दीतील अंजनगाव-बारी मार्गावरील एका शाळेजवळील जंगल परिसरात एका तरुणाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. ही घटना ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास उघड झाली. मृताची ओळख अद्याप पटली नाही. टायटन्स पब्लिक स्कूलजवळील जंगल परिसरात सोमवारी सायंकाळी अंदाजे ३० ते ३२ वर्षे वयोगटातील एक तरुण मृतावस्थेत पडून असल्याचे परिसरातील नागरिकांना दिसून आले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. यावेळी मृताच्या गळ्यावर चाकूचा खोल वार दिसून आला. त्यामुळे त्याची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. मृताच्या हातावर अजय असे गोंदल्याचे दिसून आल्याचे बडनेरा पोलिसांनी सांगितले.
जयस्तंभ ते रेल्वे स्टेशन पुलावरील घटनालोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जुन्या वैमनस्यातून एका २५ वर्षीय तरुणावर चाकूने सपासप वार करण्यात आले. त्याला रक्तबंबाळ स्थितीत टाकून मारेकऱ्यांनी पळ काढला. तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जयस्तंभ चौकाकडून रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या पुलावर ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास चाकूने भोसकल्याची ती घटना घडली. प्रेमराज उर्फ माँटी अनिल गोले (२५, दत्तवाडी, महाजनपुरा) असे मृताचे नाव आहे.
या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी अजय वानखडे (२५, रा. खरकाडीपुरा) याच्या तक्रारीवरून रविवारी सहा विधीसंघर्षित बालकांविरूद्ध खून, खुनाचा प्रयत्न, जमाव जमवून हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला. तक्रारीनुसार, फिर्यादी अजय व प्रेमराज उर्फ माँटी हे परस्परांचे लहानपणापासूनचे मित्र आहेत. दोन बालक पाच महिन्यांपूर्वी ते दगडीपुलावर बसून गल्लीतील मुलांना त्रास देत होते, म्हणून अजय व माँटी यांचा त्यांच्यासोबत वाद झाला होता.
अशी झाली घटना माँटी व अजय हे पुलाशेजारी उभे असताना तीन दुचाकीवरून काही मुले आली. त्यांनी माँटी व अजयसमोर वाहने आडवी लावलीत. ज्यांच्याशी त्यांचा पाच महिन्यांपूर्वी वाद झाला होता, त्या दोन विधीसंघर्षित बालकांनी दोघांनाही शिवीगाळ केली. त्यांच्यासह अन्य साथीदारांनी माँटीच्या पोटात, पाठीवर व हातापायावर चाकूने वार केले. माँटी व अजयने तेथून पळण्याचा प्रयत्न केला. तर अजयने कसेबसे कोतवाली ठाणे गाठले. पोलिस व अजयने माँटीला इर्विनमध्ये आणले. तेथून त्याला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पाच विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले.