अमरावती : राज्यात दुसऱ्या क्रमांकाची संस्था असलेल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेची पंचवार्षिक निवडणूक रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून प्रारंभ झाली. मतदान प्रक्रिया सुरू असताना मोर्शी वरुडचे आमदार देवेंद्र भुयार हे थेट मतदान केंद्रात गेले. मात्र त्यांचे मतदान नाही त्यांना आतमध्ये प्रवेश केला कसा? अशी विचारणा विकास पॅनलच्यावतीने करण्यात आली. त्यावरुन, या मतदान केंद्रावर वाद झाला. मात्र, मी मतदान प्रतिनिधी आहे, त्यामुळे मी आत गेलो, असे देवेंद्र भुयार यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र भुयार यांच्या येण्यावरुन तू -तू मै- मै झाली. दोन्ही गट अमोर- समोर आले. अखेर पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. गर्दी पांगविण्यासाठी सौम्य लाठी चार्ज करून परिस्थिती नियंत्रण आणली. आमदार देवेंद्र भुयार यांचे मतदान नसताना ते केंद्रावर केंद्राच्या गेल्यामुळे दोन गटात प्रचंड वाद झाला, हे वास्तव आहे. त्यांनतर काही जणांनी मतदान केंद्रात प्रवेश केल्यामुळे वाद जास्त उफाळून आला. कालांतराने हा वाद आटोक्यात आला. पण, पहिल्यांदाच श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अशा प्रकारे गालबोट लागलं आहे.
म्हणून मी आतमध्ये होतो - भुयार
मी मतदान प्रतिनीधी आहे, त्यामुळे मला तो अधिकार आहे, कारण भारत देशात लोकशाही आहे. म्हणून मी आतमध्ये थांबणार आहे. संख्येने जास्त लोकं आतमध्ये थांबले, त्यावेळी सरांनी जास्त लोक आतमध्ये न थांबण्याचं सांगितलं. ज्यांचं प्रतिनिधीत्व नाही, त्यांनी बाहेर थांबावं असं त्यांनी सांगितलं होतं. मी आतमध्ये प्रतिनिधी होतो, त्यामुळे मला बाहेर कुठे मारहाण झाली हे माहिती नाही. ही संस्था फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांवर चालणारी ही संस्था आहे, असेही भुयार यांनी म्हटलं.
दरम्यान, विकास पॅनल आणि प्रगती पॅनल यांच्या ही निवडणूक चांगली चुरशीची होत आहे. या निवडणुकीत ७७४ आजीवन सभासदाना मतदानाचा अधिकार आहे.