अमरावती : वरुड तालुक्यातील सैदापूर शिवारात महफिल जमवत एक्का बादशाहावर जुगार खेळणाऱ्या सात जुगाऱ्यांना रंगेहाथ अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चारचाकी, दुचाकी, पाच मोबाईल, रोख असा एकूण ९ लाख ३९ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने १७ जून रोजी ही मेगा कारवाई केली.
अटक जुगाऱ्यांमध्ये प्रमोद टोंगसे (४५, रा. जरूड), रमेश घोम (५२, रा. हनवतखेड), सलीम खॉ इब्राहिम खॉ (४०, रा. आंबेडकर चौक वरूड), मुकुंद बेलसरे (३५, गांधी चौक पुसला), संतोष साहु (३२, रा. पटेल मोहल्ला आठनेर, मध्यप्रदेश), चरणसिंग राठोड (४०, रा. परसोडा ता. चांदुर बाजार) व मोहन मानकर (४९, रा. रूख्मिनी नगर, मोर्शी) यांचा समावेश आहे. १७ जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना सैदापूर शेतशिवारातील जुगाराबाबत माहिती मिळाली. जुगाऱ्यांना जप्त मुद्देमालासह वरूड पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले.
यांनी केली कार्यवाहीपोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक शशीकांत सातव यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख तथा पोलीस निरिक्षक तपण कोल्हे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरिक्षक नितीन चुलपार, सहायक पोलीस उपनिरिक्षक संतोष मुदाने, अंमलदार बळवंत दाभणे, रविंद्र बावने, भुषण पेठे, शाम सोनोने, निलेश मेहरे तसेच वरूड ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक धिरज राजुरकर यांनी ही कार्यवाही केली.