अमरावती : माहेरहून तब्बल २० लाख रुपये आणण्याची मागणी पूर्ण न झाल्याने एका विवाहितेला घराबाहेर हाकलून देण्यात आले. याप्रकरणी तिच्या इंजिनीअर पतीसह पाच जणांवर कौटुंबीक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला. वलगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पुसदा येथे ही कौटुंबीक अत्याचाराची मालिका घडली.
येथील एका तरुणीचा पुसदा येथील इंजिनीअर तरुणाशी विवाह झाला होता. त्यावेळी तरुणीच्या वडिलांनी लग्नात सोन्याचे दागिने दिले. मात्र, लग्नाच्या १५ दिवसांनंतरच सासरच्या मंडळीने तिचा छळ सुरू केला. आपला मुलगा इंजिनीअर असताना लग्न चांगले केले नाही, मोठी भेटवस्तू दिली नाही, असे टोमणे मारले जात होते. तुझे वडील निवृत्त झाल्याने त्यांना पैसे मिळाले आहेत. त्यातील २० लाख रुपये आण, त्यातून आपल्याला बिझनेस करायचा आहे, असा तगादा तिच्या पतीने लावला. त्यावर तिने नकार दिला असता, पतीने तिला गतवर्षी दसऱ्याच्या दिवशी माहेरी आणून सोडले.
फोन कॉलही उचलेना
पीडित विवाहितेने पतीला अनेकदा फोन कॉल लावले. मात्र, त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे मुलीचा संसार उद्ध्वस्त होऊ नये, यासाठी तिचे पालक तिला घेऊन ५ ऑगस्ट रोजी तिच्या सासरी पोहोचले. गेल्यावरही २० लाख आणले का, अशी विचारणा पतीसह सासू, सासरा, दीर व एका महिलेने तिच्याकडे केली. त्यावर माझ्या आई - वडिलांकडे इतके पैसे नाहीत, असे तिने म्हटले. तुला वागवीत नाही, असे म्हणून पतीने शिविगाळ केली आणि तुमची मुलगी तुम्ही घरी घेऊन जा, असे बजावून त्यांना हाकलून देण्यात आले. अखेर समेट घडवून न आल्याने पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.