अमरावती : उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान (एमएसआरएलएम), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषदेच्यावतीने ५ ब्लॉक अँकर तर १७ सिनियर सीआरपी पदासाठी शनिवारी शहरातील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक कन्या शाळा येथे परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते. या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना परीक्षेसाठी १२ वाजताची वेळ दिली होती. परंतु, प्रत्यक्षात ही परीक्षा तीन तास उशिरा सुरू झाल्याने परीक्षार्थींनी यावेळी संताप व्यक्त केला. यासंदर्भात विचारणा केली असता, तांत्रिक अडचणीमुळे परीक्षेला उशीर झाल्याचे सांगण्यात आले.
उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान (एमएसआरएलएम), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद अंतर्गत अमरावती, तिवसा, चांदूर बाजारा, मोर्श व चांदूर रेल्वे तालुक्यातील एकात्मिक शेती प्रभाग प्रकल्पांतर्गत रिक्त असलेल्या पाच आयएफसी ब्लॉक अँकर तर सिनियर सीआरपी (वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती) १७ पदाकरिता परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये ब्लॉक अँकर पदासाठी ४५ शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांनी तर सिनियर सीआरपी पदासाठी २७ पात्र उमेदवारांनी अर्ज केले होते. यामध्ये ४० गुणांची लेखी तर १० गुणांची तोंडी परीक्षेचे स्वरूप ठेवण्यात आले होते. शनिवार दि. ३ फेब्रुवारीला शहरातील जिल्हा परिषदेची माध्यमिक कन्या शाळा येथे दुपारी १२ वाजता ही परीक्षा होणे अपेक्षित होते. परंतु दुपारी तीन पर्यंतही परीक्षा सुरू न झाल्याने परीक्षार्थींमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. अखेर दुपारी ३ वाजता या परीक्षेला सुरुवात करण्यात आली. परंतु ग्रामीण भागातून आलेल्या परीक्षार्थींना उशिरा सुरू झालेल्या परीक्षेमुळे चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.