अमरावती : एका महिलेला मयत दाखवून तिच्या मालकीचे शेत तब्बल २ कोटी ७४ लाख २० हजारांमध्ये विकण्यात आले. अलिकडे हा प्रकार माहित होताच कागदोपत्री मृत दाखविलेल्या त्या महिलेने गाडगेनगर पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी त्या महिलेच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी १८ जानेवारी रोजी सायंकाळी चाैघांविरूद्ध फसवणूक व फौजदारी स्वरुपाचा कट रचल्याचा गुन्हा दाखल केला.
मौजे तारखेडा येथील ९० आर व मोजा अकोली येथील ०.६९ आर जमीन तक्रारकत्या महिलेच्या सासऱ्याच्या नावाने आहे. ती त्यांच्या सासऱ्याच्या मालकीची आहे. त्यात सदर महिला देखील वारस असताना चार आरोपींनी संगणमत करून, कट रचून त्या महिलेला मयत दाखविले. कागदोपत्री मृत दाखवून वारस हक्क प्रमाणपत्र तयार करण्यात आले. ते खरे असल्याचे भासवून त्या आधारे त्या दोन्ही शेतजमिनीची २.७४ कोटी रुपयांमध्ये परस्परच विक्री केली. २७
ऑगस्ट २०२० ते २२ डिसेंबर २०२२ दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी आरोपी मनोहर संपतराव नाईक (७५, रा. रूख्मिनीनगर), रोशन राजेंद्र नाईक (२८, रा. अकोली), शुभम राजेद्र नाईक (२४, रा. अकोली) व एक महिला अशा चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.