नरेंद्र जावरेलोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : परतवाडा-अचलपूर या जुळ्या शहरातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी पंधरा किलोमीटर अंतरावरील चंद्रभागा प्रकल्पातून सुरू असलेला पाणीपुरवठा गर्भश्रीमंतांसाठी की सर्वसामान्य गोरगरिबांसाठी, असे म्हणायची वेळ आली आहे. संतप्त नागरिकांना शांत करण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. अचलपूर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात कोट्यवधीचा घोळ व लिकेजच्या नावावर लाखो रुपये काढण्यात येत असल्याची चर्चा बरीच बोलकी आहे. जीवनावश्यक पाणीपुरवठा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात ‘अ’ वर्ग नगरपालिका ‘ढ’ ठरली आहे.
श्रीमंत भागात चौथ्या माळ्यावर पाणी? परतवाडा शहरातील गर्भश्रीमंत परिसरात राहणाऱ्या व्यापारी व इतर नागरिकांच्या कॉलनी परिसरात पाण्याची ओरड होतच नाही. त्यामुळे गरिबांसाठी मृत असलेली योजना फक्त श्रीमंतांसाठी अमृत ठरली आहे. गोरगरिबांसाठी लावण्यात आलेल्या स्टँड पोस्ट नळातून पाण्याचा थेंब कधी पडतो, याची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या गरिबांची अवस्था, तर दुसरीकडे गर्भश्रीमंतांच्या चौथ्या माळ्यावर पोहोचणारे पाणी अनियमितता स्पष्ट करते.
स्लम एरियात दुर्लक्षजुळ्या शहरात अनेक हल्ले, कॉलन्या आहेत. त्यामध्ये परतवाडा शहरातील कैकाडीपुरा, पेन्शनपुरा, मुगलाईपुरा, तारानगर व इतर भाग आहेत. अचलपूर शहरातील हीरापुरा, दिलदारपुरा, देवळी, सरमसपुरा, गांधी पूल, हनवतपुरा, जुना बस स्टँड परिसर अशा अनेक भागांचा समावेश आहे.
का मिळत नाही गरिबांना पाणी? मेळघाटच्या पाण्यावर परतवाडा, अचलपूर शहराच्या पायथ्याशी तीन प्रकल्प उभारले. त्यातून जुन्या शहरासह अंजनगाव, दर्यापूर आणि आता चांदूरबाजार तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा होईल. जुळ्या शहरात आलेली मुख्य पाईपलाईन आठ टाक्यांना जोडण्यासोबत गर्भश्रीमंत भागात थेट जोडले गेल्याची माहिती खास सूत्राने ‘लोकमत’ला दिली.