अमरावती : महिनाभरापासून ४३ ते ४४ अंश तापमानामुळे अंगाची काहिली होत असताना बुधवारी दुपारी ३.१५ च्या सुमारास अचानक अर्धा तासपावेतो मान्सूनपूर्व पाऊस कोसळला, पावसासह आलेल्या वादळाने शहरातील काही भागात वाहनांवर झाडे पडली. बाजार समितीमध्ये विक्रीला आणलेली धान्याची पोती पावसामुळे भिजल्याने खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी पावसामुळे सर्वत्र तारांबळ उडाल्याचे दिसून आले.
शहरात दुपारी ३ च्या सुमारास वातावरणात अचानक बदल झाला व १० ते १५ मिनिटांत जोरदार हवेसह मान्सूनपूर्व पावसाची एंट्री झाली. अर्धातासपावेतो पावसाचा जोर वाढतच गेला. या पावसाचा दुचाकीस्वारांनी मनसोक्त भिजत आनंद घेतला तर रस्त्यावरील काही नागरिकांनी आडोसा घेतला. यामध्ये वीजपुरवठा खंडित झाल्याने गोंधळात भर पडली.
शहरातील शासकीय वसाहतीसह काही भागात हवेमुळे झाडे कोसळली. फांद्या तुटून रस्त्यावर, वाहनांवर पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी तारांवर फांद्या पडल्याने वीजपुरवठा खंडित झालेला आहे. त्यात नळही येणार नसल्याचे मजीप्राने अगोदरच जाहीर केले असल्याने नागरिकांना अनेक समस्या उद्भवत आहेत.
मान्सूनपूर्व नियोजनाची पोलखोल
मे महिन्यात महापालिका, महावितरणद्वारा मान्सूनपूर्व कामे करण्यात येतात, किंबहुना आता सुरुवातही करण्यात आलेली आहे. मात्र, उशिराच्या नियोजनाअभावी मान्सूनपूर्व पहिल्याच पावसाने यंत्रणेच्या मान्सूनपूर्व नियोजनाची पोलखोल झाली आहे. विजेच्या तारांवर फांद्या पडल्याने काही भागातील वीजपुरवठा विस्कळीत, खंडित करण्यात आल्याचे दिसून आले.
शासकीत वसाहतीत झाड पडल्याने वाहने दबली
येथील जुन्या बायपास मार्गावर असलेल्या शासकीय वसाहतीमध्ये उपजिल्हा निवडणूक अधिकारी नरेंद्र फूलझेले यांच्या घरासमोरील मोठी झाडे पडल्याने त्यांच्या स्वत:च्या वाहनासह शासकीय वाहन झाडाखाली दबली गेल्याने वाहनांचे मोठे नुकसान झालेले आहे. यासह शहराच्या आऊटस्कड भागात वादळामुळे झाडे पडली व काही ठिकाणी फांद्या तुटून रस्त्यावर पडल्या आहेत.
बाजार समितीत उघड्यावरील शेतमाल भिजला
येथील बाजार समितीत शेतकऱ्यांनी बुधवारी शेतमाल विक्रीला आणला होता. ही पोती उघड्यावर असल्याने अचानक आलेल्या पावसाने भिजली आहेत. यामध्ये हरभरा, तूर व सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. मार्केट यार्डात व्यापाऱ्यांची पोती असल्याने शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल ठेवायला जागा नाही. त्यामुळे पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.