अमरावती : ऐतिहासिक गाविलगड किल्ल्यात गुरुवारी दुपारी लागलेली आग शुक्रवारी मोठ्या प्रमाणात आटोक्यात आली. परंतु, परिसराचा कोळसा झाला आहे. धुमसत असलेली आग किल्ल्याच्या तटबंदीखालील बागलिंगा खोऱ्यात विझवण्याचे कार्य सुरू होते. अख्खी रात्र कर्मचाऱ्यांनी जागून किल्ल्यातील वनसंपदा वाचवण्याचा प्रयत्न केला.
मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि वनविभागाच्या जंगलात मोठ्या प्रमाणात आगीच्या घटना घडत आहेत. गुरुवारी दुपारी चिखलदरा पर्यटनस्थळावरील ऐतिहासिक गाविलगड किल्ल्यातील वनसंपदेचा आगीच्या ज्वाळांनी कोळसा केला. किल्ला परिसरात मोठ्या प्रमाणात गवत असल्याने हवेच्या वेगाने ही आग सर्वत्र पसरत होती. त्यामुळे वनकर्मचाऱ्यांना प्रचंड कसरत करावी लागली. संपूर्ण रात्र ब्लोअर मशीन आणि हिरव्या झाडांच्या फांद्या तोडून आग आटोक्यात आणण्यात आली.
गाविलगड वनपरिक्षेत्र अधिकारी दिनेश वाळके, वनपाल कासदेकर, हिरे, वनमजूर, कर्मचारी, अंगारी रात्रभर जागले. किल्ल्यातील राणीचा झरोका व परिसरातील सर्व वनसंपदा जळून खाक झाली आहे. भीमकुंड खोरे आणि किल्ल्यातील मशीद परिसर वाचविण्यात यश आले आहे. धुमसत असलेली आग पुन्हा किल्ल्यावर परतण्याची भीती वनाधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे ते लक्ष ठेवून असल्याचे सांगण्यात आले.
फांद्या तोडून वाचवली झाडे आणि आगीच्या उजेडात केले काम
गाविलगड किल्ला परिसरातील आगडोंब पाच किलोमीटर अंतरावरील अप्पर प्लेटो भागातील हरिकेन, मोझरी पॉईंट व परिसरातून दिसत होता. हिरव्या झाडांच्या फांद्या तोडून वृक्ष वाचविण्याचा प्रयत्न त्याच आगीच्या प्रकाशात रात्रभर वनकर्मचारी करीत होते.
रक्ताचे पाणी, पण प्यायला नाही पाणी
वणवा पेटल्यानंतर अंगारी, वनकर्मचाऱ्यांना जिवावर उदार होऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करावा लागतो. गुरुवारी संपूर्ण रात्रभर प्यायलाही पाणी नसल्याने तलावातील हिरवे पाणी वनकर्मचाऱ्यांना यावे लागले. आगीच्या ज्वाळा पाहता रक्ताचे पाणी होत प्रचंड घाम आणि घाबरल्याचा अनुभव वनकर्मचाऱ्यांनी लोकमतकडे कथन केला.
संपूर्ण रात्रभर वनकर्मचारी, अंगारी आग आटोक्यात आणली. हवेच्या वेगाने मोठ्या प्रमाणात वीज होण्यात अडथळा निर्माण झाला. धुमसत असलेली आग वीज देण्याचे कार्य अजूनही सुरू आहे.
- दिनेश वाळके, वनपरिक्षेत्र अधिकारी, गाविलगड परिक्षेत्र, चिखलदरा