अमरावती : आंतरजातीय विवाह करून पतीसोबत संसार थाटणाऱ्या मुलीला तिच्या कुटुंबीयांनी चक्क तिच्या घरात येऊन तिला फरफटत नेले. ही धक्कादायक घटना अंबाडा (ता. माेर्शी) या गावात घडली. या घटनेमुळे अख्ख्या जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मुलाने याप्रकरणी पत्नीला फरफटत नेल्याची तक्रार मोर्शी पोलिसांत दिली आहे.
अंबाडा येथील प्रेमीयुगुलाने २८ एप्रिल रोजी आर्य समाज मंदिरात जाऊन लग्न केले होते. या लग्नाला मुलीच्या आईवडिलांसह नातेवाईकांचा विरोध होता. मुलीने आंतरजातीय विवाह केल्यामुळे चिडलेल्या मुलीच्या नातेवाईकांनी थेट तिचे घर गाठले आणि मुलीला चक्क घरातून फरफटत बाहेर आणले. मुलीच्या सासरच्या मंडळींनी मुलीच्या नातेवाइकांचा विरोध केला. मात्र, यावेळी दोन्ही कुटुंबांत हाणामारी झाली. मुलीच्या नातेवाईकांनी चक्क मुलीला उचलून नेल्याच्या प्रकारामुळे अंबाडा गावात खळबळ उडाली. हा प्रकार गेल्या ४ मे रोजी घडला असून या प्रकाराचा व्हिडिओ साेशल मीडियावर व्हायरल झाला. मुलगी ही मराठा समाजाची, तर मुलगा हा माळी समाजाचा असल्याची माहिती समोर आली आहे.
आमच्या सुनेला घरातून उचलून नेणाऱ्या तिच्या नातेवाईकांना विरोधात मोर्शी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मात्र, या तक्रारीची दखल अद्यापही पोलिसांनी घेतली नसल्याचे सासरच्या मंडळींचे म्हणणे आहे, त्यांनी पोलिसांच्या भूमिकेबाबत रोष व्यक्त केला आहे.
पत्नीला सासरच्यांनी ४ मे रोजी घरी येऊन फरफटत नेले, अशी तक्रार मुलाने दिली आहे. मात्र, मुलगी कुठे ठेवली याचा पत्ता लागला नाही. मात्र, तिला एका ठिकाणी ठेवल्याची गोपनीय माहिती शनिवारी मिळाली असून, मुलीचे बयाण नोंदविण्यासाठी चमू पोहोचली आहे. २८ एप्रिल रोजी या दोघांचे अमरावती येथे लग्न झाले.
- श्रीराम लांबाडे, ठाणेदार मोर्शी.