अमरावती : प्रशासन आणि राजकारण निवडणुकीत व्यस्त असल्याने शेतकरी वाऱ्यावर आहेत. अशा परिस्थितीत यंदाच्या मार्च महिन्यात तब्बल ३६ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास ओढला आहे. राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात होत आहेत. त्यातच अमरावती जिल्ह्यात दोन दशकातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या मार्च महिन्यात झालेल्या आहेत. किंबहुना राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात होत आहे.
यंदाच्या तीन महिन्यात तब्बल ८८ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. यापैकी फक्त एक शेतकऱ्याला शासन मदत देण्यात आलेली आहे, यामध्ये ८१ प्रकरणे अजूनही चौकशीसाठी प्रलंबित आहे. यंदा जानेवारी महिन्यात २४, फेब्रुवारी २८ तर मार्च महिन्यात ३६ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.जिल्ह्यात नोव्हेंबर २०२३ पासून आतापर्यंत तीन वेळा वादळासह अवकाळी पावसाने खरीप, रब्बी, भाजीपाला व फळपिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. आता आठवडाभरापासून अवकाळीचे सत्र सुरू आहे.
मात्र, यंत्रणेद्वारा अद्याप पंचनामे सुरू करण्यात आलेले नाही. निवडणुकीचा बाऊ करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये भर पडली आहे. हातातोंडचा घास हिरावल्या गेल्याने शेतकऱ्यांच्या संघर्षावर नैराश्य भारी पडले व यामध्ये धीर खचून शेतकरी मृत्यूला फास ओढत असल्याचे जिल्ह्याचे वास्तव आहे.