लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रेशनकार्डधारकांचे धान्य दुकानात आल्यापासून त्यांना किती मिळाले, याचा एसएमएस संबंधित कार्डधारकासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या मोबाइलवर मिळणार आहे. यासाठी रेशन दुकानदारांद्वारा संबंधितांचे मोबाइल क्रमांक फोर जी पॉश मशीनमध्ये लिंक करण्यात येत आहेत.
सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये पारदर्शी पद्धतीने रेशन धान्याचे वाटप व्हावे, यासाठी पुरवठा विभाग आग्रही आहे. यामध्ये वेळोवेळी अनेक बदल करण्यात आलेले आहे. लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे धान्य मिळावे, यासाठी पुरवठा विभागाद्वारा रेशन कार्डधारकांचे मोबाइल क्रमांक मशीनमध्ये जोडण्यात येत आहे. सध्यादेखील ही प्रक्रिया सुरू आहे. या मोबाइल क्रमांकावर येणारे एसएमएस ऑटो जनरेटेड असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाने दिली.
जिल्ह्यात एकूण अंत्योदय व प्राधान्य गटात ४,९४,२१६ रेशनकार्डधारक आहेत व यामध्ये १९,६२,३४४ सदस्यसंख्या आहे. यापैकी सद्यःस्थितीत २,९२,१४८ रेशनकार्डधारकांनी मोबाइल जोडणीची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. हे प्रमाण ५९.११ टक्के आहे.
पोर्टलद्वारे ऑटो जनरेटेड एसएमएस संबंधित रेशनकार्डधारकांना मिळत आहे. याद्वारे धान्याची उचल केल्याची माहिती, मिळालेल्या धान्याचा संदेश संबंधितांच्या मोबाइलवर प्राप्त होत आहे. सर्व रेशनकार्डधारकांनी मोबाइल क्रमांकाची जोडणी करण्याचे आवाहन सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी प्रज्वल पाथरे यांनी केले आहे.
ठसा जुळत नाही, ओटीपीद्वारे धान्य बरेचदा संबंधित रेशनकार्डधारकाचा ठसा जुळत नाही, अशा वेळी जोडणी केलेल्या मोबाइलवर ओटीपी देण्यात येतो व त्याद्वारे ओळख पटवून त्यांना रेशनचे धान्य मिळते. ही सुविधा मोबाइल जोडणीमुळे उपलब्ध होते. शिवाय रेशन धान्याची उचल व वितरणाची माहिती मिळते. रेशनकार्डधारकाच्या कुटुंबातील मोबाइल जोडणी केलेल्या सर्व सदस्यांना ही सुविधा उपलब्ध असल्याची माहिती पुरवठा विभागाने दिली.