लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : मध्य प्रदेशातील भैसदेही तालुक्यात गुडगावनजीक भरणाऱ्या पूर्णामातेच्या यात्रेसाठी रविवारी गेलेल्या तिन्ही युवकांच्या दुचाकीला कारची धडक त्यांच्या जीवनाचा अंत करणारी ठरली. अचलपूर तालुक्याच्या येनी पांढरी व वडगाव येथील युवकांच्या अपघाताची माहिती कळताच तिघांचेही मित्र घटनास्थळी रवाना झाले. सोमवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घटांग ते काटकुंभ मार्गावर भैसदेही तालुक्यातील देडपाणीनजीक दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या स्थितीवरून अपघाताची भयावहता स्पष्ट झाली. दुचाकीवरील तिघांपैकी घटनास्थळी दोघांचा, तर परतवाडा येथील खासगी रुग्णालयातून उपचारासाठी अमरावतीला नेत असताना एकाचा वाटेतच मृत्यू झाला. चारचाकी वाहनाच्या पुढील भागाचाही पूर्णतः चुराडा झाला. हे तिन्ही युवक रविवारी मध्य प्रदेशातील पूर्णामातेच्या यात्रेला गेले होते. रात्री मुक्कामाला राहून त्यांनी गाव गाठण्यासाठी प्रवास केला. मात्र, तो प्रवास अखेरचा ठरला. या घटनेबाबत हळहळ व्यक्त होत आहे.
अमित आणि राज घरात एकुलतेअपघातात राज नागापुरे व अंकुश पारस्कर (दोघेही रा. येनी पांढरी) व अमित ठाकूर (रा. वडगाव फत्तेपूर) ठार झाले. राजला तीन बहिणी आहेत. अमितही दोन बहिणींचा एकटा भाऊ होता. अंकुश पारस्करला धाकटी बहीण व भाऊ आहे. या तिघांच्याही घरावर तसेच गावातही शोककळा पसरली आहे.
कुटुंबाची भिस्त कोसळली, वडील करतात मजुरीतिन्ही युवक अविवाहित आणि होतकरू होते. पैकी दोघे ऑटोरिक्षाचालक होते. एक वाहन चालविण्याचे काम करायचा. त्यातून ते परिवाराला आर्थिक मदत करीत असत. राजचे वडील शिंपीकाम करतात, तर अंकुशचे वडील शेतमजूर आहेत. अमितचे वडीलही मजुरी करून कुटुंबाला हातभार लावतात.
हवेत उडाली दुचाकी : अपघात एवढा भीषण होता की, दुचाकी चारचाकीवरून उसळून हवेत झेपावली आणि खाली कोसळली. त्यातील एक युवक दोनशे फुटांवर फेकला गेला, तर दुसरा वाहनासह ५० फूट घासत गेला. तिसरा रस्त्यालगतच्या शेतात जाऊन पडल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी गावकऱ्यांना दिली.