अमरावती : नात नकोशी झाल्याने एका विवाहितेला तिच्या सासू सासऱ्यांनी घराबाहेर काढले. पैशाची व दुचाकीची मागणी पुर्ण न केल्याने पतीसह सासरच्या मंडळीने आपला मानसिक, आर्थिक व भावनिक छळ चालविल्याची तक्रार विवाहितेने नोंदविले आहे. याप्रकरणी, २९ मे रोजी रात्री परतवाडा पोलिसांनी विवाहितेचा पती मुशफिक परवेज अ. रफिक (३२), सासू, सासरा अ. रफिक अ. हाफिज (६५), नणंद, दिर अ. मुजम्मिल अ. रफिक (३०, सर्व. रा. अंजनगाव सुर्जी) यांच्याविरूध्द कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल केला.
पिडित २५ वर्षीय तरूणीचे अंजनगाव येथील मुशफिक परवेज याच्याशी लग्न झाले. तेव्हापासून सासरच्या मंडळीने तिचा छळ चालविला. तू हुंडा कमी आणला, आम्ही दुसरी मुलीला सून म्हणून आणले असते तर आम्हाला अधिक हुंडा मिळाला असता, असे म्हणत आरोपी पतीने तिला मारहाण केली. शिविगाळ देखील केली. माहेरून दोन लाख रुपये आण, अन्यथा तलाक देण्याची धमकी तिला देण्यात आली. तो अनन्वित त्रास सहन न झाल्याने अखेर तिने सोमवारी रात्री अंजनगाव पोलीस ठाणे गाठले.
दरम्यान पिडिता ही पाच महिन्यांची गर्भवती असताना तिच्यावर दबाव टाकून तिला तिच्या मामाकडून दोन लाख रुपये आणण्याचा तगादा लावण्यात आला. मात्र ती त्यांची मागणी पुर्ण करू शकली नाही. तिला मुलगी झाल्यानंतर ती आमच्या काय कामाची, अशी हेटाळणी करून तिला सासरी येण्यास मज्जाव करण्यात आला. तेव्हापासून आपण मामाच्या दयेवर जगत असल्याचे विवाहितेने म्हटले आहे. आपली कुठलिही चूक नसताना सासरच्या मंडळीने आपल्याला टाकून दिल्याचे तिचे म्हणणे आहे.