लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ‘गोल्ड चोर बॅंक, युनियन बॅंक हाय हाय...’ असा फलक घेऊन एका ग्राहकाने शुक्रवारी राजापेठस्थित युनियन बॅंकेसमोर निषेध व्यक्त केला. महिनाभरापूर्वी यूबीआयमध्ये सुमारे दोन कोटी रुपयांचा गोल्ड लोन फ्रॉड उघड झाला. शहरातील राष्ट्रीयीकृत बॅंकेतील हा पहिला फ्रॉड ठरला आहे. कोट्यवधी रुपयांच्या या अपहाराचा मास्टरमाईंड दुसरा तिसरा कुणी नव्हे, तर चतुर्थश्रेणी कर्मचारी निघाला आहे. बॅंकेच्या लॉकर्समध्ये असलेल्या २,३०० ग्रॅम खऱ्या सोन्यावर तेथील शिपाई पवन पारेकरची नजर गेली. त्याला त्यातून श्रीमंतीचा मार्ग गवसला. लॉकर्समधील ग्राहकांचे खरे सोने सुवर्णकारांकडे गहाण ठेवून त्याने ६० ते ७० लाख रुपये घेतले. अलीकडे हा गोरखधंदा उघड झाला अन् पारेकरची ‘पारी’ अकाली संपुष्टात आली. गोल्ड लोन फ्रॉड उघड होताच ग्राहकांचा विश्वास उडाला. तो आता निषेधापर्यंत पोहोचला आहे. शहरातील हजारो ग्राहक अपहाराच्या धास्तीने यूबीआयमधून ठेवी काढत आहेत.
७२ लाखांचे बनावट प्रस्तावखरे सोने काढून त्याजागी बनावट सोने ठेवण्यात आले. आरोपी त्यावर थांबले नाहीत, तर त्यांनी सुमारे ७२ लाख रुपये कर्जाचे २२ प्रस्ताव बनवले. त्यासाठी मागणी न केलेल्या मात्र बॅंकेच्या ग्राहक असलेल्या २२ खात्यांचा वापर करण्यात आला. त्यातही बनावट सोने दाखवून ७२ लाख रुपये गोल्ड लोन उकळण्यात आले. त्यामुळे शिपाई पारेकरव्यतिरिक्त या घोटाळ्यातील अन्य चेहरे उघड झाले आहेत.
असा घडला अपहार३७ ग्राहकांनी २,३०० ग्रॅम सोने गहाण ठेवून त्या किमतीच्या ७० टक्के रक्कम गोल्ड लोन म्हणून घेतली. पैकी लॉकर्समधील सुमारे १,५०० ते १,६०० ग्रॅम सोने पारेकरने वर्मा व सोनी या सुवर्णकारांकडे गहाण ठेवले. त्यातून ६० ते ७० लाख रुपये मिळवले. त्यात भोंडवेने मध्यस्थी केली. त्यापोटी त्यांनी तेवढ्याच वजनाचे बनावट सोने लॉकर्समध्ये ठेवले. एकूण २३०० ग्रॅम सोने तारण असताना पैकी काहींना पारेकरने सोने परत दिले. मात्र, ती रक्कम बॅंकेत भरलीच नाही. अनेकांनी पारेकरकडे पैसे दिले. त्या डिपॉझिटच्या नोंदी पारेकरने बॅंकेत घेतल्याच नाहीत. काही जण समोर आलेत, मात्र त्याने बॅंकेबाहेर सेटलमेंट केली.
हे गेले कारागृहातयाप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने यूबीआयच्या राजापेठ शाखेचा तत्कालीन व्यवस्थापक जतीन प्रेमचंद कुंद्रा, सहायक व्यवस्थापक गाैरव पुरूषोत्तम शिंदे, शिपाई पवन अरूण पारेकर व खासगी व्यक्ती सतीश भोंडवे यांना अटक केली. त्यांच्या जबाबावरून शेखर वर्मा व ओमप्रकाश सोनी या सुवर्णकारांना अटक करण्यात आली. त्या दोघांकडून ९८५ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. आता सहाही आरोपी मध्यवर्ती कारागृहातील कोठडीत आहेत.