अनिल कडू
परतवाडा (जि. अमरावती) : प्रसुतीनंतर मेळघाटातील ओल्या बाळंतिणीसह बाळाला या रुग्णालयातून त्या रुग्णालयात उपचारासाठी फिरविण्यात आले. या प्रवासादरम्यान नवजात बाळाची प्रकृती अधिकच खालावली. २ नोव्हेंबरला जन्मलेले हे बाळ अमरावतीच्या शासकीय रुग्णालयात ४ नोव्हेंबरला दगावले. तेव्हा मात्र मृतदेह गावी नेण्यासाठी मातेला रुग्णवाहिका मिळू शकली नाही. आरोग्य व्यवस्थेच्या अनास्थेमुळे निष्पाप बाळाचा बळी गेल्याचा संताप या घटनेवरून व्यक्त केला जात आहे.
मेळघाटातील रुईपठार गावातील वर्षा सेलूकर (२२) हिला यंत्रणेमार्फत प्रसूतीसाठी हतरू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रसूतीनंतर तिला लगेच बाळासह चुरणीतील दवाखान्यात पाठविले. पुन्हा अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. तेथून पुढे बाळासह अमरावती येथे पाठविले गेले. २ नोव्हेंबरला जन्माला आलेल्या या बाळासह ओल्या बाळंतिणीला हा प्रवास रुग्णवाहिकेतून घडविला गेला. प्रवासात प्रकृती खालावल्याने अमरावती येथील शासकीय रुग्णालयात बाळाची ४ नोव्हेंबरला प्राणज्योत मालवली. त्यानंतर मात्र मृतदेह गावी नेण्यासाठी बालकाच्या आईला रुग्णवाहिका नाकारण्यात आली.
रात्र काढली जागून
आपल्या काळजाच्या तुकड्याचा मृतदेह कापडात गुंडाळून त्याच्या चेहऱ्याकडे बघत त्या दुर्दैवी मातेला रात्र जागून काढावी लागली. सकाळ उजाडल्यानंतर कापडात गुंडाळलेला मृतदेह छातीशी कवटाळत गावी जाण्याकरिता वाहन उपलब्ध व्हावे म्हणून ती यंत्रणेकडे याचना करीत होती. अखेर पालकांनी आग्रही भूमिका घेतली आणि एक खासगी वाहन उपलब्ध करून दिले गेले.