अमरावती : राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतिनिमित्त महापालिका प्रशासनाच्या वतीने सोमवारी शहरातून ‘स्वच्छता ही सेवा’ रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये महापालिका आयुक्त देवीदास पवार यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊन नागरिकांना स्वच्छतेचा संदेश दिला. यावेळी आमदार प्रवीण पोटे पाटील यांनीही या रॅलीमध्ये सहभागी होऊन रॅलीत सहभागी विद्यार्थी तसेच नागरिकांसोबत संवाद साधला.
केंद्र शासनाच्या आयुष्यमान भव या मोहिमेंतर्गत तसेच महात्मा गांधी जयंती निमित्त ‘स्वच्छता हीच सेवा’ या अंतर्गत स्वच्छता पंधरवाडा राबविण्यात येत आहे. याच अनुषंगाने महापालिका सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत स्वच्छता मोहीम व रॅली चे आयोजन केले होते. शहरातील नेहरू मैदान येथून या रॅलीची सुरुवात करण्यात आली. यावेळी सर्जराव गलपट यांनी महात्मा गांधी यांच्या वेशभूषा साकारली होती. तसेच काही विद्यार्थ्यांनी संत गाडगे बाबा यांची वेशभूषा साकारली होती. रॅलीतून डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया या सारख्या कीटकजन्य आजाराविषयी पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली.
याप्रसंगी बोलतांना आयुक्त देवीदास पवार यांनी स्वच्छतेचे आरोग्याशी असलेले नाते सांगत केंद्र सरकारने कचरामुक्त शहरांचे अभियान राबविताना ‘स्वच्छोत्सव २०२३’ आयोजित करून नागरिकांचे स्वच्छता कार्यातील महत्व अधोरेखित केल्याचे सांगितले. ‘स्वच्छोत्सव २०२३’ च्या अनुषंगाने अधिकारी, कर्मचारी, नागरिक आणि विद्यार्थ्यांनी यशस्वी केलेल्या या ‘स्वच्छता ही सेवा रॅली’चीही विशेष दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
रॅलीमध्ये स्वच्छता संदेशांचे फलक झळकवत स्वच्छ, सुंदर, प्लास्टिकमुक्त शहर करण्याचा निर्धार करण्यात आला. जयस्तंभ चौक येथे रॅलीची सांगता होत असताना ‘ओला, सुका व घातक’ कचरा वर्गीकरणाविषयी जनजागृती केली. यावेळी उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, शहर अभियंता इकबाल खान, पर्यावरण संवर्धन अधिकारी महेश देशमुख, सहाय्यक आयुक्त योगेश पिठे, भूषण पुसतकर, नंदकिशोर तिखिले, धनंजय शिंदे, विवेक देशमुख, लीना आकोलकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, महिला व बाल विकास अधिकारी नरेंद्र वानखडे, शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम, मुख्य लेखाधिकारी प्रवीण इंगोले, पशू शल्यचिकित्सक डॉ. सचिन बोंद्रे, उद्यान अधीक्षक श्रीकांत गिरी, भांडार अधीक्षक मंगेश जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. सीमा नैताम सह मोठ्या संख्येने मनपा अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.