लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : आजच्या घडीला प्रत्येक कामे ही ऑनलाइनद्वारे होत आहेत. झोमॅटो ही पाच मिनिटात घरपोच डिलिव्हरी देत असेल तर शासकीय सेवक म्हणून नागरिकांची कामे तत्क्षणी झाली पाहिजे, त्याकरिता सात दिवसांचा अवधी कशाला? असे म्हणत लोकांची कामे 'टाईम लिमिट'मध्ये करा, असे निर्देश राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त डॉ. नरुकुल्ला रामबाबू यांनी येथे दिले.
अमरावती महानगरपालिका स्तरावर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या प्रभावीपणे अंमलबजावणीची गुरुवारी आढावा बैठक पार पडली. यावेळी अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव त्यांनी करून दिली. डॉ. नरुकुल्ला रामबाबू पुढे म्हणाले, लोकसेवा हक्क कायद्यातील सेवा नागरिकांना वेळेत द्यावी या अधिनियमान्वये शहरातील नागरिकांना पारदर्शक गतिमान व कालबद्ध सेवा मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला असून, या कायद्याची सर्व विभागांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. प्रत्येक कार्यालयात सेवा हमी कायद्याच्या अधिसूचित सेवांची सूची दर्शनी भागावर प्रदर्शित करावी, त्यात पदनिर्देशित अधिकारी, प्रथम अपील अधिकारी, अपील अधिकारी यांचे नाव निर्देशित केलेले असावे, अशा त्यांनी सूचना केल्या. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक सचिन कलंत्रे यांनी राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त डॉ. नरुकुल्ला रामबाबू यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्तद्वय डॉ. मेघना वासनकर, नरेंद्र वानखडे व योगेश पिठे, कक्ष अधिकारी देवेंद्र चव्हाण, मुख्यलेखापरीक्षक श्यामसुंदर देव, मुख्यलेखापाल दत्तात्रय फिस्के, एडीटीपी घनश्याम वाघाडे, शहर अभियंता ईश्वरानंद पनपालिया, सहायक आयुक्त भूषण पुसतकर, नंदकिशोर तिखिले, दीप्ती गायकवाड, धनंजय शिंदे, सुभाष जानोरे, एमओएच डॉ. विशाल काळे, डॉ. अजय जाधव, सिस्टम मॅनेजर अमित डेंगरे, इओ प्रकाश मेश्राम, कार्यकारी अभियंता रवींद्र पवार, अधीक्षक नंदकिशोर पवार, उद्यान अधीक्षक श्रीकांत गिरी, दीपक खडेकार, मंगेश जाधव, उदय चव्हाण, योगेश कोल्हे, लक्ष्मण पावडे, डॉ. स्वाती कोवे, श्यामकांत टोपरे, प्रमोद इंगोले, आशिष अवसरे, आदी उपस्थित होते.