चांदूर रेल्वे (अमरावती) : तालुक्यातील घुईखेड येथील चंद्रभागा नदीपात्रात सापडलेल्या मृतदेहाप्रकरणी खुनाचा अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा व तळेगाव दशासर पोलिसांनी केवळ सहा तासांत उलगडा करत वर्धा जिल्ह्यातील आठ आरोपींना अटक केली. अद्याप एक आरोपी पसार आहे. खून पूलगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत झाल्याने प्रकरण तेथे वर्ग केले.
आरोपींनी अकबर अली वल्द जब्बार अली (३५, रा. लिंगू फैल, पुलगाव) यांचा संगनमताने खून करून त्याचा मृतदेह दगडाने बांधून ५ ऑगस्ट रोजी तळेगाव दशासर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घुईखेड येथील चंद्रभागा नदीपात्रात फेकून दिला होता. याप्रकरणी पोलिसांनी पूनम सतीश इरपाचे (३२), गौरव दीपक उईके (२३), रूपेश रामेश्वर कावरे (३७), सुदाम सतीश काकडे (३७), अनिकेत शंकर वाघाडे (२४), स्वाती रामेश्वर कावरे (३०), अभय देविदास भागडकर (२०), किसन मोतीराम राऊत (६०, सर्व रा. लिंगू फैल, पुलगाव) यांना अटक केली. आकाश प्रभाकर कोडापे (२६) हा पसार आहे.
पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या मार्गदर्शनात अपर पोलिस अधीक्षक शशिकांत सातव, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिंद्र शिंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण वानखडे, तळेगाव दशासरचे ठाणेदार रामेश्वर धोंडगे यांनी तपासाला प्रारंभ केला. संयुक्त दोन पथके तयार करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक यांच्या पथकाने मृताची ओळख पटविल्यानंतर पूलगाव शहर गाठले.
दारूच्या उधारीवरून वाद
मृत अकबर अली व आरोपी पूनम इरपाचे यांच्यात दारूच्या उधारीवरून वाद झाला. त्यामुळे तिने साथीदारांसमवेत त्याचा खून केल्याचे पुढे येताच वायगाव निपाणी (जि. वर्धा) येथून पूनम व सुदाम काकडे याला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या माहितीवरून इतर आरोपी गवसले.
असा झाला खून
पुलगाव येथील इतर साथीदारांच्या मदतीने पूनमच्या घरातच अकबर अलीचा दोरीने गळा आवळून खून करण्यात आला. यानंतर त्याचा मृतदेह चारचाकीने घुईखेड येथील चंद्रभागा नदीपात्रात दगड बांधून टाकल्याची कबुली अटकेतील आठ आरोपींनी दिली. पोलिसांनी ते वाहन जप्त केले आहे.
यांनी केली कारवाई..
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण वानखडे, तळेगाव दशासरचे ठाणेदार रामेश्वर धोंडगे, उपनिरीक्षक कपिल मिश्रा व मोहम्मद तस्लीम शेख गफुर, अंमलदार पुरुषोत्तम यादव, सचिन मिश्रा, शकील चव्हाण, मंगेश लकडे, चंद्रशेखर खंडारे, सचिन मसांगे, सागर धापड, गजेंद्र ठाकरे, संदेश चव्हाण, पवन अलोणे, श्याम गावंडे, अमर काळे, नीलेश येते यांच्या पथकाने आरोपींना जेरबंद केले.