अमरावती : एक-दीड महिन्यावर आलेल्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या मानगुटीवर यंदाही ‘सिबिल’चा फास आहेच. स्कोअर ६५० पर्यंत नसल्यास कर्ज मिळण्यास अडचणी निर्माण होणार आहे. नियमित खातेदार यामधून सुटतीलही. मात्र, ही संख्या कमी असल्याने अधिकाधिक शेतकरी पीककर्जापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झालेली आहे.
पीककर्जासाठी ६५० सिबिल स्कोअर पाहिला जाणार आहे. त्यामध्येही राष्ट्रीयीकृत व व्यावसायिक बँका याकडे बारकाईने पाहणार आहे. कर्जमाफीनंतर सातबारा कोरा झाल्यानंतर मागच्या हंगामात उच्चांकी ९४ टक्के कर्जवाटप बँकांद्वारा करण्यात आले होते. यामध्ये फारतर २० टक्केच शेतकरी नियमितपणेे कर्जाचा भरणा करू शकतात; तसेच १० टक्के नव्याने पीककर्ज घेतीलही, उर्वरित ७० टक्के शेतकऱ्यांना पुन्हा सिबिलचा सामना करावा लागणार आहे.