अमरावती : राज्यात चांद्यापासून तर बांध्यापर्यंत जंगल अथवा नागरीवस्तीत सहजतेने बिबट आढळत असल्याच्या घटना निदर्शनास येत आहेत. हल्ली बिबट्यांची संख्या १६९० ईतकी नोंद झाली असून त्यांना अधिवासासाठी जंगल अपुरे ठरत आहे. परिणामी शिकार किंवा अन्नाच्या भटकंतीसाठी बिबट्यांनी शहराकडे धाव घेतल्याचे वास्तव आहे.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात बिबट्यांची संख्या १६९० इतकी झाल्याची नोंद आहे. त्यात राखीव जंगलाच्या बाहेरील बिबट्याचा समावेश नाही. मात्र नैसर्गिक, रस्ते, रेल्वे अपघात, विहिरीत पडून, शिकार, विजेच्या प्रवाहासह इतर कारणांमुळे सन २०११ ते २०२१ या दरम्यान गत दहा वर्षात ८६२ बिबट्यांचा मृत्यू झाल्याची बाब चिंता वाढवणारी आहे. विशेषत: २०२० मध्ये सर्वाधिक १७२ बिबट्यांचे मृत्यू झाले आहेत. ८६२ बिबट्याच्या मृत्युपैकी ८८ घटना शिकारीच्या २८ घटना विजेचा धक्का लागून, १३ विषबाधा तर २७ बिबटे सापळा आणि फासमध्ये अडकून असे एकूण १५६ घटना शिकार व शिकारजन्य कारणामुळे घडलेल्या आहेत. तर बिबट्यांच्या मृत्यूचे प्रमाण हे ४३ टक्के इतके आहे. राज्य वन्यजीव अपराध नियंत्रण ब्यूरो स्थापन झाल्यास हा आकडा अतिशय कमी प्रमाणावर आणता येऊ शकतो, असा अहवाल राज्याच्या वन्यजीव विभागाने केंद्र शासनाला डिसेंबर २०२३ मध्ये पाठविला आहे. बिबट्याचा नैसर्गिक स्वभाव, वर्तणूक, बदलणाऱ्या परिस्थितीनुसार जुळवून घेण्याची क्षमता व मोठ्या प्रमाणातील प्रजोत्पादनामुळे बिबट्यांच्या संख्या वाढत आहेत. बिबट्यांचा मुक्त संचार सर्वच क्षेत्रात असल्याने राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि जिल्हा मार्गावरही त्याचा मृत्यूच्या घटना घडतात. या कारणामुळेच मानव- बिबट्यांचा संघर्ष वाढतो आणि बिबट्यांचे मृत्यू व मानवहानीच्या घटण्यामध्ये वाढ झाली आहे. - यादव तरटे पाटील, वन्यजीव अभ्यासक अमरावती.नागपूर हिवाळी अधिवेशनातही गाजला बिबट
अमरावती येथील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या परिसरात ऑक्टोंबर ते डिसेंबर या कालावधीत बिबट ठिय्या मांडून होता.त्याच्यापासून नागरिकांना धोका होऊ नये, यासाठी पोलिस आणि वन विभागाची चमू सुरक्षिततेसाठी तैनात होती. मात्र, हा बिबट जेरबंदकरावा म्हणून आमदार सुलभा खोडके यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात लक्षवेधीद्वारे सभागृहाचे लक्ष वेधले होते. अखेर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बिबट जेरबंद करावा, असे आदेश दिले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा बिबट जेरबंद करून मेळघाटच्या जंगलात सोडण्यात आले. तब्बल अडीच महिन्यानंतर अमरावतीकरांना बिबट्यापासून सुटका मिळाली, हे विशेष.