नरेंद्र जावरे
(अमरावती) : चिखलदरा (अमरावती) : पावसाळा लागताच विदर्भाचे नंदनवन चिखलदरा पर्यटकांनी गजबजून गेले आहे. शुक्रवार ते रविवार अशा तीन दिवसांत तब्बल ३५ हजार पर्यटकांनी चिखलदऱ्याला भेट दिली. त्यातून नगरपालिकेला दीड लाख रुपयांपेक्षा अधिक महसूल प्राप्त झाला आहे.
घाटवळणाच्या रस्त्यावर पसरलेले दाट, शुभ्र धुके आणि धो-धो कोसळणारा पाऊस अंगावर झेलण्यासाठी हजारो पर्यटक दरवर्षी चिखलदऱ्यात गर्दी करतात. यंदा पावसाने दडी मारली आहे. मात्र, याउपरही विदर्भ व लगतच्या मध्य प्रदेशातील पर्यटक वीकेंडला चिखलदऱ्यात दाखल झाले. तीन दिवसांत मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा घाटवळणाच्या रस्त्यांवर दिसल्या.
आता वाहनाचा द्यावा लागणार कर
चिखलदरा नगर परिषदेतर्फे पूर्वी प्रौढ व्यक्ती, विद्यार्थी, लहान मुले यांच्याकडून पर्यटन कर वसूल केला जात होता. त्यासाठी वाहनातील डोकी मोजली जात होती. आता मात्र दुचाकी, तीनचाकी, चारचाकी, मिनी बस, मोठी वाहने अशी कर आकारणी होते. प्रवाशांऐवजी केवळ वाहनाचा कर आता घेतला जात आहे.