नागपूर : आमदार बच्चू कडू व आमदार रवी राणा यांच्यातील संघर्ष आता टोकाला गेला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. रवी राणा यांनी बच्चू कडूंवर गंभीर आरोप करत त्यांनी गुवाहाटीला जाऊन पैसे लाटल्याचा आरोप केला होता. या आरोपावरून बच्चू कडू आक्रमक झाले होते. राणा यांनी पुरावे सादर करावे अन्यथा नोटीस पाठवणार, असल्याचे म्हटले होते. तर, आता १ नोव्हेंबर रोजी मोठा बॉम्बच फोडणार असल्याचा इशारा कडू यांनी दिला आहे.
बच्चू कडू यांनी बुधवारी नागपुरात पत्रकार परिषद घेत राणा यांच्या आरोपावर मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जनतेसमोर येऊन स्पष्ट करण्याची मागणी केली. तर, रवी राणांनीही कडूंवर टीकास्त्र सोडले. गुरुवारी रात्री रवी राणांनी एक ट्विट करत बच्चू कडू यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. ''दिवा जेव्हा विझतो तेव्हा तो फडफड करतो, त्यातला 'हा' एक दिवा आहे, दिवाळीत खूप फटाके फुटले त्यातला 'हा' फुसका फटाका आहे'' असे ट्विट रवी राणा यांनी केले. यानंतर बच्चू कडू काय प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
टीव्ही ९ शी बोलताना बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. एक तारखेला एक व्हिडीओ जारी करणार असल्याचं ते म्हणाले आहेत. हा वाद माझ्यापुरता मर्यादीत नाही. पैसे देऊन सरकार स्थापन झाले का? मग मला पैसे कुणी दिले? सर्व आमदारांनी अडचणीत आणणारे हे आरोप आहेत. रवी राणा यांनी केलेले आरोप मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर सुद्धा आहेत, त्यामुळे हे आरोप कायमचे मिटले पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी मांडली. मी नंगा होईल मला काही फरक पडत नाही, माझं राजकारण चुलीत गेलं तरी चालेल. उद्या राजीनामा द्यावा लागला तरी चालेल, ही आरपारची लढाई आहे. तुम्ही असे आरोप करत असाल, तर आम्ही आंडूपांडू थोडी आहोत? जमिनीत नांगर घालणाऱ्या शेतकऱ्याची औलाद आहोत. आम्ही घालून टाकू नांगर, अशा रोखठोक शब्दांत बच्चू कडूंनी रवी राणांना सुनावलं आहे.
बावनकुळे म्हणाले..
आ. बच्चू कडू व आ. रवी राणा हे दोघेेही समजदार नेते आहेत. त्यांच्यात काही गैरसमज निर्माण झाले आहेत. लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या दोघानांही एकत्र बसवून वाद मिटवतील, असा दावा करीत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
आरोपांची चौकशी करा, काँग्रेसची मागणी
- आ. रवी राणा यांनी माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्यावर पैसे घेऊन गुवाहाटीला गेल्याचे आरोप केले आहेत. हे आरोप अत्यंत गंभीर असून कोण किती खोके घेऊन गुवाहाटीला गेले होते याची ईडी सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. रवी राणा यांनी शिक्कामोर्तबच केले आहे. रवी राणा हे आमदार या संवैधानिक पदावर असून ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या आरोपांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असा चिमटाही लोंढे यांनी काढला आहे.
बच्चू कडूंनी रवी राणा व राज्य सरकारलाही १ नोव्हेंबरपर्यंतचा वेळ दिला असून यासंदर्भात पुरावे सादर करण्याचं आव्हान दिलं आहे. १ नोव्हेंबरपर्यंत या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं तर मोठा गौप्यस्फोट करेन, असा इशाराही बच्चू कडू यांनी दिलाय. त्यामुळे आता १ नोव्हेंबरला काय घडते, हे बघणे औत्सुक्याचे असणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"