गजानन मोहोड
अमरावती : इंधन दरवाढीने मशागतींसह पेरणीचा खर्च वाढला असतानाच बियाणे व खतांच्या दरातही वाढ झाली आहे. पाच वर्षांत दुप्पट दरवाढीमुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढला व याची झळ बसल्याने नियोजन करताना शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.
विभागात कापूस व सोयाबीन ही प्रमुख पिके आहेत. यामध्ये सोयाबीनचे १४.५९ लाख व कपाशीचे १०.७५ लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आलेले आहे. त्यात सध्या सोयाबीन व कपाशीला मिळत असलेला उच्चांकी भाव लक्षात घेता, किमान ५० हजार हेक्टरमध्ये या पिकांची क्षेत्रवाढ होण्याचा अंदाज आहे.
यंदा मृग नक्षत्राला ८ जून रोजी सुरुवात झाली. मान्सूनची गती मंदावल्याने अजून पाच ते सहा दिवस पाऊस येण्याची शक्यता नाही. मात्र, हंगामापूर्वीच कंपन्यांनी बियाणे व खतांच्या दरात वाढ केली आहे. तसे पाहता पाच वर्षांत कृषी निविष्ठांच्या दरात जवळपास दुपटीनेच वाढ झालेली आहे. पाच वर्षांपूर्वी १,७०० रुपये प्रतिबॅग असणारे सोयाबीन बियाणे यंदा ३,२०० ते ३,५०० रुपयांवर पोहोचले आहे. कापसाचे ४५० ग्रॅमचे ‘बीजी-२’चे पाकीट गतवर्षी ७६७ रुपयांना होते, तेच पाकीट यंदा ८१० रुपयांवर पोहोचले आहे. याशिवाय युरिया वगळता सर्वच रासायनिक खतांच्या दरात मोठी वाढ झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.
सोयाबीन बियाणे दरातही दुपटीने वाढ
पाच वर्षांपूर्वी म्हणजेच २०१८ मध्ये सोयाबीनच्या ‘जे. एस. ९३०५’ वाणाची ३० किलोची बॅग १,९५० रुपयांना होती. २०१९ मध्ये १,८५० रुपये, सन २०२० मध्ये २,२५० रुपये, सन २०२१ मध्ये २,५५० रुपये व यंदा ३,५०० रुपये असा दर आहे. याशिवाय कपाशीचे ‘बीजी-२’चे ४५० ग्रॅमचे पाकीट गतवर्षी ७६७ रुपयांना होते, ते यंदा ८१० रुपयांना आहे.