लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : तुरीचा हमीभाव ७ हजार रुपये असताना वर्षभर १० ते १२ हजार रुपये क्विंटल भाव मिळाला आहे. केंद्र शासनाने यंदा ५५० रुपयांनी वाढ केल्याने ७,५५० रुपये क्विंटल असा हमीभाव २०२४-२५ या वर्षात मिळणार आहे. त्या तुलनेत यंदा कापसाचा हमीभाव ७,५२१ रुपये आहे. तुरीचा उत्पादनखर्चही कमी असल्याने यंदा तुरीचे पेरणीक्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.
तुरीची पेरणी खरिपात होत असली तरी हंगाम मात्र रब्बीमध्ये होते. त्यामुळे तुरीचे आंतरपीक घेण्याकडे शेतकऱ्यांना कल असतो. दोन वर्षांपासून तुरीच्या सरासरी उत्पन्नात कमी आल्याने मागणी वाढून तुरीला उच्चांकी भाव मिळाला आहे. सध्या तूर १२ हजार रुपये क्विंटलप्रमाणे विकल्या जात आहे. सोयाबीन, कपाशीच्या तुलनेत तुरीला जास्त दर असल्याने यंदा तुरीचे पेरणीक्षेत्र वाढण्याची शक्यता असल्याचे कृषी विभागाने सांगितले.
यंदाच्या हंगामात तुरीचे १.१८ लाख हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. त्या तुलनेत किमान ३० हजार हेक्टरमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कपाशी हे जिल्ह्याचे 'कॅश क्रॅप' असले तरी उत्पादन खर्च जास्त, मजुरांच्या तुटवड्याने वेचणीचे दर जास्त शिवाय बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातुलनेत तुरीचा उत्पादन खर्च कमी असल्याचे शेतकरी सांगतात. त्यामुळे यंदा आंतरपीक म्हणून शेतकऱ्यांची पसंती असल्याचे दिसून येते.
तुरीचे तालुकानिहाय सरासरी क्षेत्रअमरावती तालुक्यात ८११२ हेक्टर, भातकुली ६७५३, नांदगाव खंडेश्वर १००८५, तिवसा ६७८३, चांदूर रेल्वे ८१६२, धामणगाव रेल्वे ६९५४, मोर्शी ८९६१, वरुड १०९१५, चांदूरबाजार १०६५२, अचलपूर १०२३७, अंजनगाव सुर्जी ७६४७, दर्यापूर ९३५९, धारणी ८१४३ व चिखलदरा तालुक्यात ५२३७ हेक्टरमध्ये यंदा तुरीचे क्षेत्र प्रस्तावित आहे. यामध्ये काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.
मजुरांचा तुटवडा, वेचणीची दरवाढ, बोंडअळीचे संकट, फवारणीचा खर्च यामुळे कपाशीचे नुकसान होते, खर्चही वाढतो, त्या तुलनेत भाव मिळत नाही. त्या तुलनेत तुरीचा उत्पादन खर्च कमी व भाव जास्त मिळत आहे. त्यामुळे यंदा तुरीचे तास वाढवित आहो.-रावसाहेब खंडारे, शेतकरी भातकुली.