अमरावती : यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील ७७६ गावांना पाणीटंचाईची समस्या भेडसावण्याची शक्यता आहे. या संभाव्य पाणीटंचाईच्या निवारणार्थ जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने २१ कोटी १८ लाख ४८ हजार रुपयांचा आराखडा पाणीपुरवठा विभागाने तयार केला होता. हा आराखडा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात मान्यतेसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला होता. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी २३ जानेवारी रोजी टंचाई आराखडा मंजूर केला आहे. त्यामुळे पाणीटंचाईची कामे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई निर्माण होणाऱ्या ७७६ गावांचा समावेश आहे. या गावांमधील नागरिकांची तहान भागविण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने टंचाई आराखडा तयार केला आहे. यामध्ये ७७६ गावांत विविध प्रकारच्या एकूण १०३३ योजना प्रस्तावित केल्या आहेत. या गावांमधील नागरिकांची तहान भागविण्यासाठी प्रशासनाने पाणीपुरवठा करण्याच्या उपाययोजना, आराखडे तयार केले आहेत. यामध्ये ३३६ गावांमध्ये पाणीपुरवठा ४४६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील २६ गावांना टँकर प्रस्तावित केले आहेत. गतवर्षी अल्प पाऊस पडल्याने यंदा नळ पाणीपुरवठा योजनांची आणि विंधनविहिरींच्या विशेष दुरुस्तीसाठी तरतूद करण्याची पाणीटंचाई कृती आराखड्यातील योजना येत्या जून महिन्यापर्यंत राबविल्या जाणार आहेत.
प्रस्तावित कामे व नियोजनएकूण उपाययोजना -१०३३एकूण गावे -७७६अपेक्षित खर्च -२१ कोटी १८ लाख ४६ हजारविहीर अधिग्रहण -४४६प्रस्तावित टँकर -२६विंधन विहीर, कूपनलिका -३३६
जिल्ह्यात २६ गावांना टँकरने पाणीपुरवठाजिल्ह्यात यंदा अल्प प्रमाणात पाऊस पडल्याने जलसाठा मुबलक समाधानकारक असला तरी त्यात २६ गावे टंचाईग्रस्त आहेत. या गावांतील लोकांना पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाकडून भर दिला जात आहे. त्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने २६ गावांत टँकरने पाणीपुरवठा करण्याची शक्यता वर्तविली आहे.
कृती आराखडा तालुकानिहाय गावेअमरावती ६६, नांदगाव खंडेश्वर ७७, भातकुली ३८, तिवसा ४२, मोर्शी ६५, वरुड ८०, चांदूर रेल्वे ७६, धामणगाव रेल्वे ५३, अचलपूर ३४, चांदूर बाजार ४२, अंजनगाव सुर्जी २१, दर्यापूर ००, धारणी ८२, चिखलदरा १००, एकूण ७७६.
जिल्ह्यात यंदा उन्हाळ्याच्या दिवसात भेडसावणाऱ्या संभाव्य पाणीटंचाई निवारणार्थ पाणीपुरवठा विभागाने २१.१८ कोटींचा टंचाई आराखडा तयार केला. सदर आराखडा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला होता. टंचाई आराखड्याला जिल्हाधिकारी यांची मंजुरी मिळालेली आहे. -सुनील जाधव, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जि. प.