गणेश वासनिक
अमरावती : बळिराजा दरवर्षी पावसाची आतुरतेने प्रतीक्षा करतो. शेतकऱ्याला पावसाची प्रतीक्षा असते, तशीच पशु-पक्ष्यांनाही पावसाचे वेध लागतात. आता सर्वदूर पाऊस बरसू लागला आहे आणि पक्ष्यांनी घरटे बांधायला घेतली आहेत. मेळघाटसह अन्य जंगलात घरटी बांधून पक्षी आपल्या पिलांचे संगाेपन करीत आहेत.
स्वर्गीय नर्तक, सुगरण, शिंपी, वटवट्या, नवरंग, तितर, मोर, पिवळ्या गालाची टिटवी, चातक, कोतवाल, सिरकीर मलकोहा, खंड्या, वेडा राघू, निळ्या शेपटीचा वेडा राघू, काश्मिरी नीलकंठ, नीलकंठ, हुदहुद, राखी धनेश, मलबारी धनेश, सुतार, चंडोल अशा अनेक पक्ष्यांचा हाच विणीचा काळ आहे. हे सगळे पक्षी कधी आपल्या जोडीदारासोबत, तर कधी एकटेच घरटी बांधायला घेतात आणि पाऊस आला की आपली पुढची पिढी येणार या स्वप्नात रंगून जीव लावून मेहनत करतात.
मेळघाट, पोहरा जंगलात झाडाच्या फांदीवर घरट्यांची शाळा
‘पल्लवपुच्छ कोतवाल’ पक्षी मेळघाट जंगलाच्या वृक्षराजीत आपली पुढील पिढी घडविण्याचा स्वप्नात गुंग होऊन काटक्या आणि मऊ गवताचे तुकडे जमा करून घरटे तयार करीत आहेत. जमिनीपासून अंदाजे २० ते २५ फूट उंच झाडाच्या फांदीवर कपबशीच्या आकाराचे घरटे आहे. उत्तरेकडून ‘नवरंग’ पक्ष्यांचेदेखील आगमन झाले असून, हा पक्षीदेखील नदी किंवा नाल्याच्या ठिकाणी असणाऱ्या आडोशाच्या झाड-झुडपांमध्ये सध्या घरटी करण्यासाठी जागा शोधण्यात मग्न आहे.
पक्ष्यांचं अस्तित्व अन् पावसाचं आगमन हे निसर्गचक्र
पाऊस येताच सुप्तावस्थेतील कीटक जीवन जागे होतात. फुलपाखरे, नाकतोडे, कोळी, बेडूक, मासे, गांडूळ, चतुर अशा अनेक कीटकांची व सजिवांची संख्या वाढली आहे. हाच अंदाज बांधून पक्ष्यांकडून घरट्यांचा सगळा खटाटोप चालला आहे. पक्ष्यांचे अस्तित्व आणि पावसाचं आगमन हा निसर्गचक्राचाच एक भाग आहे.
चातक पक्ष्याचे दर्शन म्हणजे पावसाचे आगमन
चातक आणि मान्सूनचे आगमन याचे नाते अजरामर आहे. सध्या पोहरा जंगल परिसरात चातक पक्ष्याचे दर्शन झाले आहे. चातक पक्ष्याचे आगमन म्हणजे पाऊस येणार हे अगदी पक्के समीकरण आहे. चातक पक्ष्याला ‘रेन व्हिसीटर’ असेही म्हणतात. ‘पावश्या’ या पक्ष्याचा आवाजच मुळात ‘पेरते व्हा.. पेरते व्हा..’ असा येतो आणि मग शेतकरी पेरणीला लागतात.
मान्सूनच्या आगमनाने जंगल हिरवेगार होते. यावर फुलपाखरे, कोळी व इतर कीटकांचे जीवन समृद्ध होते. पर्यायाने पक्ष्यांना मोठ्या प्रमाणात खाद्य मिळते. जंगलातील जैवविविधता व अन्नसाखळी असेच तेथील परिसंस्था संतुलित होते. शेती आणि अर्थकारण तसेच पर्यावरण संतुलन यासाठी मान्सूनचे आगमन अत्यंत महत्त्वाचे आणि लाभदायी आहे.
- यादव तरटे - पाटील, पक्षिमित्र, अमरावती